ठाणे - मुलगी झाली म्हणून पतीने पत्नीकडूनच जन्माला आलेल्या मुलीच्या संगोपनासाठी तीस हजार रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खळबळजनक बाब म्हणजे सदर रक्कम पत्नी देऊ न शकल्याने पतीने व दिरांनी मिळून तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात पतीसह दोन दीरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलशान गामा मोमीन असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. तर सोनू आणि नौशाद असे गुन्हा दाखल झालेल्या दिरांची नावे आहे.
पीडित पत्नीने मुलीला जन्म देतात छळ सुरू -
पीडितेचा काही महिन्यापूर्वीच आरोपी दिलशन याच्याशी मुस्लिम रितीरिवाजाप्रमाणे निकाल झाला होता. त्यानंतर मार्च महिन्यात पीडित पत्नीला मुलगी झाली होती. त्यामुळे आरोपी पतीने 20 मार्च ते 18 मे 2020 या दोन महिन्यांच्या काळात पत्नीला मुलगी झाली म्हणून मुलीच्या संगोपनासाठी तीस हजार रुपये मागणीचा तगादा तिच्याकडे लावला होता. मात्र, माहेरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने तीस हजार रुपये देण्यास पत्नी असमर्थ ठरली होती. त्यामुळे पती व दोन दिरांनी आपसात संगनमत करून पीडित पत्नीचा छळ सुरू केला होता. अखेर या छळाला कंटाळून पीडित विवाहितेने शांतीनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पतीसह दोन दिरांविरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा - हैवान बाप..! जेवताना लघुशंका केल्याच्या रागातून ६ वर्षाच्या मुलाला दिले चटके
"बेटी बचाव बेटी पढाव" अभियान प्रभावीपणे राबविण्याची गरज -
एकीकडे आजही समाजातील काही कुटुंबात वंशाला दिवा म्हणून मुलगाच झाला पाहिजे, अशी मानसिकता असलेले अनेक कुटुंब या समाजात असल्याचे बहुतांश घटनांवरून समोर आले आहे. तर दुसरीकडे "बेटी बचाव बेटी पढाव" हा केंद्र सरकारने नारा देत, यासाठी समाजात विविध कार्यक्रमांतर्गत जनजागृती राबवित आहेत. मात्र, आजही समाजातील काही लालची आणि निर्दयी कुटुंब मुलाच्या हौसेपोटी मुलीचा छळ करून तिला जन्म देणाऱ्या मातेचाही मानसिक व शारीरिक छळ करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे "बेटी बचाव बेटी पढाव"ची केवळ घोषणा न करता समाजात मुलीचा छळ करणाऱ्या अशा कुटुंबापर्यंत जनजागृती प्रभावीपणे राबविण्याची आवश्यकता असल्याचे या घटनेवरून दिसून आले आहे.