ठाणे - जोरदार वादळी पावसामुळे भिवंडी तालुक्यातील अंबाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत उंबरपाडा येथे आज (शनिवारी) सायंकाळच्या सुमारास अंगावर वीज पडून एक तरुणी जागीच ठार झाली. तर ३ जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
प्रमिला वाघे (२०) असे अंगावर वीज पडून ठार झालेल्या तरुणीचे नाव आहे, तर मंगल्या वाघे (५८) त्यांची पत्नी अलका वाघे (५०) आणि त्यांचा नातू विजय (४) असे गंभीर जखमी झालेल्याची नावे आहेत.
मागील आठवड्यापासून उसंत घेतलेल्या पावसाने शनिवारी सायंकाळी जोरदार वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटाने सुरुवात केली. याच वेळी उंबरपाडा येथे राहणारे आदिवासी वाघे कुटुंबीय नदी किनारी शेतीच्या कामासाठी गेले होते. सायंकाळच्या सुमारास काम आटपून घराच्या दिशेने ते येत होते. मात्र, अचानक ढगात विजेचा कडकडाट होऊन त्यांच्या अंगावर वीज पडली. या घटनेत अलका वाघ हिचा जागीच मृत्यू झाला तर तिचे आई-वडील आणि त्यांचा चार वर्षाचा नातू विजय गंभीर जखमी झाले. या जखमींना तातडीने अंबडी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर तेथे उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच या परिसरातील तलाठी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या घटनेमुळे उंबरपाडा गावातील आदिवासी पाड्यात शोककळा पसरली आहे.