ठाणे - बदलापूर पूर्व परिसरातील औद्योगिक भागात असलेल्या एका केमिकल कंपनीच्या ड्रायरमध्ये झालेल्या भीषण स्फोटात एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तीन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. विष्णु धडाम (वय ६०) असे स्फोटात मृत झालेल्या कामगाराचे नाव आहे. तर विजयपथ पिंगवा (वय २०), झागरा मोहतो (वय ५६) तर, विनायक जाधव (वय ५६) हे तीन कामगार भाजले आहेत. त्यांची प्रकृति गंभीर आहे.
जखमी असलेल्या सर्वांना उपचारासाठी नवी मुंबईतील ऐरोली येथील बर्न केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. हा स्फोट इतका भीषण होता कि, त्याचा हादरा बदलापूर पूर्वच्या ३ ते ४ किलोमीटरच्या परिसरात जाणवला होता. बदलापूर पूर्व परिसरात जे के रेमेडीज नावाची केमिकल कंपनी आहे. सकाळच्या सुमारास कंपनीच्या ड्रायर मध्ये ४ ते ५ कामगार काम करत होते. त्यावेळी अचानक ड्रायरमध्ये भीषण स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता आनंदनगर ,शिरगाव, कात्रप मानकीवली, खरवई जुवेली आदी परिसरात जाणवली होती. घटनेची माहिती मिळताच कुळगाव-बदलापूर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले होते. अग्निमशन दलाच्या जवानांनी एका तासाच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियत्रंण मिळवले. या स्फोटाच्या आवाजाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.