ठाणे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात जीव धोक्यात घालून सर्वेक्षणाचे काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांना अद्याप त्यांचे मानधन मिळालेले नाही. याबाबत पालिकेचे अधिकारी वेगवेगळी कारणे देत आहेत. त्यामुळे हा निधी नेमका कुठे खर्च केला, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत कोरोना योद्ध्यांनी संताप व्यक्त केला.
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात दारोदारी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणादरम्यान कोरोना योद्धा म्हणून नाममात्र मानधनावर काही तरुण व तरुणींनी सर्वेक्षणाचे काम केले. विशेष म्हणजे, कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना महिनाभर जीव धोक्यात घालून त्यांनी घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले. मात्र, अद्याप या कोरोना योद्धांना मानधन मिळाले नसल्याचे उघड झाले आहे. याबाबत आज या तरुण-तरुणांनी थेट पालिका मुख्यालय गाठत संताप व्यक्त केला.
महापालिका हद्दीत घरोघरी जाऊन कोरोनाचे सर्वेक्षण करणाऱ्यांना पालिका प्रशासनाकडून 350 रुपये मानधन देण्यात येणार असल्याचे सांगितले होते. मात्र, काम पूर्ण केल्यानंतर दोघांच्या टीमला मिळून 350 रुपये देणार असल्याचे सांगितले. परंतु, अद्याप तेही देण्यात आलेले नाही. कोरोना काळात विविध सुविधांसाठी पालिकेने आतापर्यंत 35 कोटी रुपये खर्च केला. मात्र, जीव धोक्यात घालून सर्वेक्षणाचे काम करणाऱ्या तरुण-तरुणींना अद्याप मानधन न मिळाल्याने या निधीबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. तर, याबाबत पालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी अश्विनी पाटील यांनी सर्वेक्षणाचे काम करणाऱ्या तरुणांना त्यांचे मानधन लवकरच मिळेल. काही तांत्रिक अडचणींमुळे विलंब झाला असला तरी सदर रक्कम त्याच्या थेट खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे सांगितले.
हेही वाचा - मुंबईची बदनामी करणाऱ्या कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा - शिवसेना आयटी सेल