ठाणे - यंत्रमाग व्यवसायाचे मँचेस्टर म्हणून भिवंडी शहराचे नावलौकिक देशभर आहे. यंत्रमाग व्यवसाय त्याचबरोबर कापड उद्योगामुळे देशातील कानाकोपऱ्यातील कामगार भिवंडीत वास्तव्यास आहेत. कोरोना संकटामुळे मागील वर्षभरापासून यंत्रमाग व्यवसायास घरघर लागली आहे. ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये कोरोना आटोक्यात आला. त्यांनतर दसरा - दिवाळी सारखे सण लागोपाठ आल्यामुळे लॉकडाऊनमुळे डबघाईला आलेल्या यंत्रमाग व्यवसायाची गाडी रुळावर यायला लागली होती. त्यातच आता पुन्हा राज्य सरकारने मिनी लॉकडाऊन घोषित केल्याने यंत्रमाग व्यवसायाची आर्थिक घडी पुन्हा विस्कटण्याच्या मार्गावर आली आहे.
हेही वााचा - उद्धवच्या हातात राज्य आहे की, त्याच्यावर कुणाचं राज्य आलंय -राज ठाकरेंची कोपरखळी
यंत्रमाग कामगारांवर उपासमारीची वेळ
मार्च महिन्यांपासून राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने डोकेवर काढले आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता राज्य शासनाबरोबरच भिवंडी मनपा प्रशासनाने देखील शहरात कडक निर्बंध लागू केले आहेत . रात्रीच्या संचारबंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस यंत्रणा देखील सतर्क झाली आहे. नियम पाळा अन्यथा लॉकडाऊन करावा लागेल, असा पवित्रा राज्य शासनाने यापूर्वीच घेतला होता. मात्र, आजही राज्य शासनाच्या लॉकडाऊन धोरणास अनेकांचा विरोध आहे. लॉकडाऊनमुळे भिवंडीतील यंत्रमाग व्यवसायाची अक्षरशः दाणादाण उडणार असून लॉकडाऊनमुळे यंत्रमाग व्यवसायाचे पार कंबरडेच मोडणार आहे. मागील वर्षभर लॉकडाऊन काळात यंत्रमाग व्यावसायिकांनी आपल्याकडे असलेल्या जमापुंजीत कामगारांना किमान पोटभर जेवण तरी दिले होते. मात्र, वर्षांभरापासून असलेल्या बंदमुळे आता अनेक यंत्रमाग व्यावसायिक कर्जबाजारी झाले आहेत. परिणामी आता बंदच्या काळात कामगारांना जेवण व भत्ता देण्यात व्यवसायिक असमर्थ ठरणार असल्याने यंत्रमाग कामगारांवर उपासमारीची वेळ येणार आहे.
यंत्रमाग व्यावसायिक कर्जबाजारी होण्याच्या मार्गावर
कोरोना संकटामुळे शासनाने गेल्या वर्षी लॉकडाऊन जाहीर केला होता. त्यावेळी यंत्रमाग व्यावसायिकांनी आपल्याकडील असलेल्या जमा पुंजीत कामगारांना व स्वतःला कसेबसे सावरले. आता अनेक व्यावसायिकांनी कर्ज काढून पुन्हा आपला व्यावसाय सुरु केला आहे. त्यातच आता पुन्हा मिनी लॉकडाऊन घोषित केल्याने यंत्रमाग व्यावसायिक जुन्या आणि नव्या कर्जाच्या ओझ्याखाली दबून कर्जबाजारी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यंत्रमाग व्यवसाय डबघाईला जाण्याची शक्यता
शासनाच्या नियमांचे पालन करण्यास यंत्रमाग व्यावसायिक तयार आहेत व ते नियम देखील पळत आहेत. मात्र, असे असतांनाही मिनी लॉकडाऊन घोषित केल्याने यंत्रमाग व्यावसायिक पूर्णतः कर्जबाजारी होईल व यंत्रमाग व्यवसाय देखील त्यामुळे डबघाईला जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही, अशी प्रतिक्रिया भिवंडीचे यंत्रमाग व्यावसायिक भूषण रोकडे यांनी दिली आहे.
हेही वााचा - भाजपला मदत करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना नव्या गृहमंत्र्यांचा इशारा