ठाणे - मागील चार दिवसांपासून मुसळधार पावसाने मुंबईसह उपनगरात हजेरी लावली आहे. 2005 सालच्या 26 जुलैच्या आठवण करून देणारा मुसळधार पाऊस पुन्हा एकदा धो-धो बरसल्याने, काल रात्री कल्याण ते बदलापूर दरम्यान मध्य रेल्वेची वाहतूक अनिश्चित काळासाठी ठप्प झाली होती. विशेष म्हणजे बदलापूर, विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात पावसाचे पाणी रेल्वे रूळावर साचल्याने या मार्गावरील रेल्वे वाहतूक सेवा ठप्प झाली होती.
या संधीचा फायदा घेत खाजगी वाहन चालक आणि रिक्षाचालकांनी प्रवाशांकडून जास्त पैशाची मागणी करत लूट केली. यावेळी कल्याण ते बदलापूर जाण्यासाठी रिक्षाचालक तब्बल दोनशे रुपये भाडे आकारात होते, तर त्याखालोखाल अंबरनाथसाठी शंभर ते दीडशे रुपये आणि उल्हासनगरसाठी पन्नास रुपये रिक्षा भाडे आकारण्यात येत होते. त्यामुळे काही प्रवाशांना चार ते पाच तास कल्याण रेल्वे स्थानकातच मुक्काम ठोकला लागला.
यामुळे बस स्थानकावर प्रवाशांची गर्दी वाढून एकच गोंधळ उडाला होता. रात्री दहा वाजल्यापासून ते पहाटे 2 वाजेपर्यंत हा गोंधळ सुरू होता. त्यावेळी काही प्रवाशांनी एसटी आगाराच्या चौकशी रूममध्ये जाऊन बदलापूर, अंबरनाथ आणि उल्हासनगरसाठी विशेष बस सोडण्याची मागणी केली. मात्र बहुतांश बसेस वाहतूक कोंडीत अडकल्याने आता बस सोडणे, कठिण असल्याचे संबंधित एसटी स्थानकातील कर्मचाऱ्याने प्रवाशांना सांगितले. यामुळे प्रवासी अधिकच संतप्त झाले होते.
कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ यासह शहराच्या सखल भागातील हजारो नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरले आहे. जिल्ह्यातील सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून, खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.तसेच जिल्यात अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे.
दरम्यान रात्री दीड नंतर उशिराने रेल्वे वाहतूक सुरु करण्यात आली. मात्र रात्रीच्या पावसाचा परिणाम सकाळीही रेल्वे वाहतुकीवर दिसून आला. रेल्वेच्या सर्वच गाड्या 20 ते 30 मिनिटे उशिरा धावत आहेत. तसेच महालक्ष्मी एक्स्प्रेस ही बदलापूर आणि वांगणीच्या मध्ये थांबवण्यात आली आहे. यामध्ये साधारण दोन हजार प्रवासी असून, आप्तकालीन सुरक्षा पथकाने तातडीने तिथे पोहोचण्याची गरज आहे.