ठाणे - अचानक ब्रेक फेल झाल्याने कंटेनर शाळेची संरक्षक भिंत तोडून आत घुसल्याची घटना उल्हासनगर जवळील म्हारळ गावात घडली आहे. अपघाताचा हा प्रकार महावीर विद्यालयामधील असून शाळा भरण्यापूर्वी हा अपघात घडल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
उल्हासनगरजवळील म्हारळ गावातील रस्त्यावर आज सकाळच्या सुमारास सिमेंट, रेतीच्या मिक्सरने भरलेल्या कंटेनरचा ब्रेक फेल झाला होता. त्यावेळी हा कंटेनर महावीर शाळेची संरक्षक भिंत तोडून आत घुसला होता. विशेष म्हणजे शाळा भरण्यापूर्वी हा अपघात घडल्याने मोठा अनर्थ टळला आहे. या शाळेसमोर मोठा उतरणीचा रस्ता असल्याने या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात मालवाहू ट्रक ये-जा करत असतात. शिवाय रस्ता अरुंद असताना देखील मोठ्या वाहनांना या ठिकाणी प्रवेश दिला असल्याने गावकाऱ्यांमध्ये नाराजी आणि संताप आहे.
या अरुंद रस्त्यावरून होणारी जड वाहनांची वाहतूक बंद करावी, अशी मागणी होत असून असे न झाल्यास मोठी दुर्घटना होऊन जीवितहानी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शाळा सुरू असताना अपघात झाला असता तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा -
पर्यटन आणि तीर्थक्षेत्रांसाठी 1400 कोटी मंजूर; मत्स्यालय, दुग्ध शालेसह अनेक घोषणा