नवी मुंबई - काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांची अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडी चौकशी सुरु आहे. याविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून देशभरात आंदोलन पुकारण्यात येत आहे. नवी मुंबईतील वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ( Chhatrapati Shivaji Maharaj Chowk Navi Mumbai ) देखील राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने नाना पटोले ( Nana Patole ) यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी जब मोदी डरता हैं ईडी को आगे करता हैं, अशी घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा जोरदार निषेध करण्यात आला.
...म्हणून ईडी कारवाई : काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावरील चुकीच्या ईडी कारवाई विरोधात मोदी सरकार विरुद्ध धरणे आंदोलन करण्यात आले. सोनिया गांधी आजारी असताना त्यांना त्रास दिला जात असून त्यांच्यावरील चुकीच्या ईडी कारवाईचा आम्ही तीव्र निषेध करत असल्याचे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने म्हटले. भाजपा सरकारच्या विरुद्ध आवाज उठवणार्या काँग्रेस पक्षावर ते ईडी सारख्या यंत्रणांचा वापर करत आहेत. काँग्रेस पक्षाच्या कार्यकाळात अवघ्या 40 ईडी कारवाया झाल्या होत्या. मात्र भाजपाच्या काळात 4000 ईडी कारवाया झाल्या आहेत. हे द्वेषाचे राजकारण अत्यंत चुकीचे आहे, अशा शब्दात आंदोलकांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.