ठाणे - मागील काही महिन्यापासून राज्यात महाविकास आघाडीत बिघाडी होत असून कोणत्याही निर्णय प्रक्रियेत समावून न घेतल्याने कॉंग्रेस पक्ष नाराज झाला आहे. आता तीच नाराज ठाण्यातही आता उघडपणे समोर येऊ लागली आहे. एकीकडे राष्ट्रवादीने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र देऊन आम्हालाही बोलावणे करा, अशी मागणी केली असून नाराजी व्यक्त केली आहे. परंतु, कॉंग्रेसने आता शिवसेना आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधत आम्हाला दोघांपैकी कोण सामावून घेतो, असा सवाल उपस्थित केला आहे. कोविड रुग्णालयाचा शुभारंभ तुम्हीच करता, पालिकेत काही शहराच्या दृष्टीकोणातून बैठकी होतात, त्यावेळेसही आम्हाला डावललेच जाते, असा धक्कादायक आरोप कॉंग्रेसचे प्रदेश सदस्य राजेश जाधव यांनी केला आहे.
मागील काही दिवसापासून राज्यात कॉंग्रेस नाराज झाला असून प्रत्येक ठिकाणी डावलले जात असल्याने वारंवार महाविकास आघाडीत ठिणगी पडत आहे. ती ठिणगी आता ठाण्यातही पडू लागल्याचे दिसू लागले आहे. राज्यात तर आम्हाला डावलले जातेच, परंतु ठाण्यातही आम्हाला डावलले जात असल्याचे मत जाधव यांनी व्यक्त केले आहे. राष्ट्रवादीकडून नाराजी व्यक्त करीत थेट आदित्य ठाकरे यांना निवेदन देऊन ठाण्यात जर कोणी मंत्री येणार असेल तर त्याची माहिती आम्हाला दिली जात नाही, असा आक्षेप घेतला आहे. परंतु, आता शिवसेना आणि राष्ट्रवादी दोघेही आम्हाला डावलत असल्याने आम्ही कधी नाराजी व्यक्त केली का? उलट आम्ही महाविकास आघाडीचे घटक म्हणून एकत्रित काम करण्याची इच्छा व्यक्त करत होतो.
आता आम्हाला साध्या कोणत्याही निर्णय प्रक्रियेत सामावून घेतले जात नाही. कॉंग्रेसला शिवसेना, राष्ट्रवादीकडून वारंवार आमच्याकडून डावलले जाते, ठाण्यात कॉंग्रेसला विचारतच घेतले जात नाही. ज्यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रित काम करत होते, तेव्हाही आम्हाला कोणी विश्वासात घेतले का?, शंभर खाटांचे कोविड हॉस्पीटलचा शुभारंभ, शहराच्या विकसाच्या दृष्टीने कोणी आम्हाला विचारत घेतले नाही. आम्ही देखील महाविकास आघाडीचाच घटक आहोत. आम्हाला देखील शहराची आणि येथील नागरिकांची काळजी आहे. पण, वारंवार डावलून आमच्यावर हा अन्याय का?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
राज्यात कॉंग्रेसच्या प्रदेश अध्यक्षांसह इतर मंत्र्यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीत बिघाडी होऊ लागली आहे. आता ही बिघाडीची ही ठिणगी ठाण्यात येऊन पोहचली असून जाधव यांनी उपस्थित केलेल्या काही मुद्यांवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी आता तरी कॉंग्रेसला विश्वासात घेतील का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
हेही वाचा - ठाण्यात कोरोनामुळे 46 वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू