ठाणे- भिवंडीतील गायत्रीनगरपरिसरात दोन दिवसापूर्वी गटारात पडलेला भाजीपाला पुन्हा काढून तोच भाजीपाला विक्रेता विक्रीसाठी घेऊन जात होता. त्यावेळी काही नागरिकांनी त्या भाजी विक्रेत्याने केलेल्या किळसवाण्या प्रकाराचे मोबाईल कॅमेऱ्यात चित्रीकरण केले होते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याची बातमी 'ईटीव्ही भारत'च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यांनतर स्थानिक पोलिसांनी या भाजी विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी भाजी विक्रेत्याचा शोध घेतला व त्याच्यावर भिवंडी शहर पोलीस ठाण्यात अयोग्य व अपायकारक भाजी विक्री केल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. हाशिम बचकू अन्सारी (वय.३६) असे गुन्हा दाखल झालेल्या भाजी विक्रेत्याचे नाव आहे. भिवंडीतील पद्मानगर परिसरात हाशिम हा भाजी विक्रेता कुटुंबासह राहतो. तो गायत्रीनगर-पद्मानगर परिसरात दोन दिवसापूर्वी दुपारच्या सुमारास हातगाडीवर भाजीपाला विक्रीसाठी रस्त्यावरून जात होता. मात्र, रस्त्याच्या मधोमध झाकण नसलेल्या गटारात हाशिमची हातगाडी अचानक कलंडली. त्यामुळे, हातगाडीवरील भाजीपाला सरळ सांडपाण्याच्या गटारात गेला. मात्र, गटारात पडलेला भाजीपाला हा खराब झाल्याची पर्वा न करता त्याने सांडपाण्याच्या गटारातून तो काढला व त्याची विक्री करू लागला. त्याच वेळी काही नागरिकांनी या किळसवाणा प्रकाराचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करून ते व्हायरल केले.
काही वेळातच हा व्हिडिओ व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून अनेकांच्या मोबाईलवर आला. नागरिकांनी हा प्रकार पाहताच भाजीपाला विक्रेत्याला गाठले व त्याने गटारातून काढलेला भाजीपाला कचराकुंडीत फेकून दिला. दरम्यान, भाजी विक्रेत्याच्या त्या किळसवाण्या प्रकारचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले व त्यांनी भाजी विक्रेत्याचा शोध घेऊन त्याच्यावर भिवंडी शहर पोलीस ठाण्यात अयोग्य व अपायकारक भाजी विक्री केल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक किणी, व पोलीस नाईक संदीप मोरे करीत आहेत. तर या घटनेमुळे ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
हेही वाचा- विरोधकांवर 'ये दीवार टुटती क्यों नही' म्हणण्याची वेळ येईल - अजित पवार