नवी मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या माध्यमातून नवी मुंबईतील अनेक भागात कोविड मास स्क्रिनिंग घेण्यात येत आहे. मात्र, या स्क्रिनींगचे श्रेय घेण्यासाठी अनेक राजकीय पक्ष सक्रिय आहेत. त्यामुळे आपल्या नेत्या व कार्यकर्त्यांसह स्क्रिनिंगच्या ठिकाणी ते अडचणी निर्माण करत आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या कामात ढवळाढवळ करू नये, असा सल्ला पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी राजकीय पक्ष व त्यांच्या कार्यकर्त्यांना दिला असून, चांगलेच फटकारले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेच्या माध्यमातून नवी मुंबईमधील प्रत्येक भागात मास स्क्रीनिंग कॅम्प घेण्यात येत आहेत. त्यामुळेही मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. मात्र, या मास स्क्रिनिंग कॅम्पमध्ये काही राजकीय नेते, कार्यकर्ते व माजी नगरसेवक श्रेय लाटण्यासाठी अडथळे निर्माण करत आहेत. यामुळे मास स्क्रिनिंगसाठी आलेल्या डॉक्टरांच्या व पॅरामेडिकल स्टाफच्या कामात अडथळे निर्माण होत असल्याच्या अनेक तक्रारी आयुक्त आण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे आल्या आहेत. त्यामुळे राजकिय पक्षाचे नेते, नगरसेवक, कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या कामात ढवळा-ढवळ करू नये, असा सल्ला आयुक्तांनी दिला आहे.