ठाणे - घराशेजारी राहणाऱ्या १६ वर्षीय महाविद्यालयीन युवतीला त्रस्त करून तिचा विनयभंग केल्याची घटना भिवंडीत समोर आली आहे. विनयभंग करणारा आरोपी विवाहीत असून त्यास दोन मुले आहेत. ही घटना भिवंडीतील खाकबावडी येथे घडली आहे. या प्रकरणी कॉलेज युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून भोईवाडा पोलिसांनी लंपटाविरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.
फिरोज उस्मान अंसारी (३० रा. खाकबावडी) असे विनयभंग प्रकरणी अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. आरोपी फिरोज हा विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. तो शेजारील ११ वीत शिकणाऱ्या युवतीला रस्त्यात भेटुन त्रास देत होता. तिला फोनवर बोलून मला तू आवडतेस, मला तुझ्याशी बोलायचे आहे. मी तुझ्याशी लग्न करेन, आपण पळून जाऊ, अशा प्रकारचा अश्लील संवाद साधून युवतीचा विनयभंग केला.
गेल्या सहा महिन्यांपासून तो तिला त्रास देत होता. त्यामुळे या रोजच्या छळाला कंटाळून पीडित युवतीने भोईवाडा पोलीस ठाणे गाठून फिरोज याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. भा. दं. वि. कलम ३५४ (ड), बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण अधिनियम १२ प्रमाणे गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच पोलीस उपनिरीक्षक जे. पी. जाधव यांनी फिरोज यास अटक केली. रविवारी भिवंडी न्यायालयात हजर केले असता त्यास ४ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.