ठाणे - पूर ओसरल्यानंतर पूरामुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या संसाराची सावरासावर सुरू आहे. त्यातच गेल्या आठवड्याभरापासून पूरातून जीव वाचवत अनेक साप मानवी वस्ती शिरल्याच्या घटना घडल्या आहेत. असाच एक सहा फुटाच्या कोब्रा नागाने वनपालाच्या दारातच फणा काढून बसल्याची घटना घडली आहे. या नागाला पाहून कुटुंबासह इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना थरकाप उडाला होता.
ही घटना कल्याण-भिवंडी मार्गावर कोण गावातील श्रीजी अपार्टमेंटमध्ये घडली आहे. समीर इनामदार हे मुंबई परिसरात वन विभागात वनपाल असून ते कुटुंबासह कोण गावातील श्रीजी कॉम्प्लेक्समध्ये तळ मजल्यावर राहतात. आज सकाळी समीर हे कामावर जाण्यासाठी दरवाजा उघडले असतातच त्यांच्या दाराच सहा फुटाचा कोब्रा नाग वेटोळे घालून फणा काढलेल्या अवस्थेत असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी लगेच दरवाजा बंद करून त्या नागाला हुसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा नाग त्याठिकाणाहून न जाता त्याच ठिकाणी घुटमळत होता.
त्यानंतर समीर इनामदार यांनी वार संस्थेचे सर्पमित्र दत्ता बोंबे यांच्याशी संपर्क साधून दारात जवळ नाग शिरल्याची माहिती दिली, माहिती मिळताच सर्पमित्र दत्ता हे घटनास्थळी येऊन त्या नागाला शिताफीने पकडून पिशवीत बंद केले. वन पालाच्या कुटुंबासह इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांनी सुटकेचा निश्वास घेतला. या नागाला कल्याणचे वनपाल क्षेत्र अधिकारी एम , डी, जाधव यांच्या परवानगीने जंगलात सोडणार असल्याची माहिती सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी दिली आहे.