ठाणे- अंड्यातून बाहेर पडताच सापाची पिल्लं फणा काढून उभी होती. याचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. ठाण्यात 13 सापांचा जन्म झाला आहे. वनविभागांच्या मार्गदर्शनाखाली व तज्ञाच्या देखरेखीखाली एका काचेच्या पेटीत सापांची अंडी कृत्रिमरीत्या उबवत होती. त्यातून आज पिल्लं बाहेर आली आहेत.
कल्याण पश्चिमेकडील गांधारी परिसरातील एका सोसायटीत कोब्रा जातीचा साप आढळल्याची माहिती वॉर रेस्क्यू टिमचे सर्पमित्र दत्ता बोंबे यांना काही दिवसांपूर्वी मिळाली. बोंबे यांनी मोठ्या शिताफीने सापाला पकडले. या मादी सापाने 13 अंडी दिली होती. वन विभागाच्या परवानगीने सापाला निर्सगमुक्त करुन त्याचे अंडी वनविभागांच्या मार्गदर्शनाखाली व तज्ञाच्या देखरेखीखाली एका काचेच्या पेटीत कृत्रिमरीत्या तयार होण्यासाठी ठेवण्यात आली होती. सर्पमित्राच्या माहितीनुसार, विषारी सापांची अंड्यातून सापाच्या जन्माला ४५ ते ६० दिवसाचा कालावधी लागतो.
आज ते दिवस भरल्याने अंड्यातून सापांच्या पिल्लांनी जन्म घेतला. सर्व पिल्लं सुदृढ व सुखरुप असून लवकरच त्यांना निर्सगमुक्त करण्यात येणार असल्याचे वॉर रेस्क्यू टिमकडून सांगण्यात आले.
दरम्यान, कोरोनाच्या काळात वॉर रेस्क्यूच्या सदस्यांनी अनेक सापांना जीवदान दिले आहे. त्यामुळे सापाला न मारता तो आढळल्यास हॅलो फॉरेस्ट 1926 या टोल फ्री नंबरवर संपर्क साधावा किंवा वॉर रेस्क्यू टिमच्या 9869343535 या किंवा 7208349301 या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन वॉर रेस्क्यू फॉऊडेशने केले आहे.