मीरा भाईंदर (ठाणे) - कोरोनाचे संकट पाहता मास्क, सॅनिटायझर वापरा आणि सामाजिक अंतर पाळा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. मुख्यमंत्री ठाकरेंच्या हस्ते भाईंदर पूर्वेकडील आरक्षण क्रमांक 122 मध्ये स्व. बाळासाहेब ठाकरे कलादालन, स्व.बाळासाहेब ठाकरे समर्पित कोविड रुग्णालय आणि मॉलेक्युलर प्रयोगशाळेचे उद्घाटन ऑनलाइनच्या माध्यमातून करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
मीरा भाईंदर शहरातील विकासकामासाठी राज्य शासनाकडून निधी कमी पडून देणार नाही, असे आश्वासनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले. कोरोनाच्या अनुषंगाने भाईंदर पूर्वेकडील स्व.बाळासाहेब ठाकरे मैदानात 700 बेडचे सुसज्ज समर्पित कोविड रुग्णालयाची तात्पुरत्या स्वरूपात उभारणी करण्यात आली. काशिमीरा परिसरातील बीएसयूपी योजना रखडली आहे. या योजनेची सुरुवातही करण्यात आली. यामुळे लाभार्थ्यांचे लवकर स्थलांतर करण्यात येणार आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी एक नवीन आरटीपीसीआर प्रयोगशाळेचेही उद्घाटन केले.
हेही वाचा - दिवाळीत प्रदूषण करणारे फटाके टाळा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
यावेळी ते म्हणाले, "कार्यक्रमास्थळी गर्दी खूप दिसत आहे. अनेक लोकांनी मास्क घातले नाही. त्यामुळे अजून कोरोना गेलेला नाही. काळजी घ्या". आता सगळ्यांसमोर ओरडत नाही, असे म्हणताच कार्यक्रमात एकच हास्य निर्माण झाले होते. गर्दी पांगवण्यासाठी यावेळी कार्यक्रमास्थळी पोलिसांसह नेत्यांची तारांबळ उडाली.