ठाणे - काँग्रेस, राष्ट्रवादीचे घोषणापत्र पाहिले असता त्यामध्ये केवळ ताज महाल बांधण्याचे आणि चंद्रावर एक एक फ्लॅट देण्याचे आश्वासन देणे बाकी ठेवल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच त्यांनी आघाडीच्या जाहीरनाम्याची खिल्ली उडवली. उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कुमार आयलानी यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री फडणवीस उल्हासनगरमध्ये आले होते. यावेळी ते बोलत होते.
हे वाचलं का? - प्रबळ विरोधी पक्ष म्हणून मनसेला निवडून द्या - राज ठाकरे
मुख्यमंत्र्यांनी प्रचार सभेत शरद पवारांवर देखील तोफ डागली. शरद पवारांच्या मागे जायला कोणी तयारच नाही. 'आधे उधर-आधे इधर जावो, कोई बचा हो तो मेरे पिछे आयो' अशी पवरांची परिस्थिती झाले असल्याचे म्हणत त्यांनी पवारांना चिमटा काढला.
हे वाचलं का? - अनर्थ टळला!, हेलिकॉप्टर अपघातातून बचावले मुख्यमंत्री फडणवीस
शेवटी मात्र मुख्यमंत्र्यांनी उल्हासनगरला मेट्रो स्टेशन करून त्या स्टेशनचे नाव सिंधू स्टेशन ठेवण्याचे जाहीर केले. त्यामुळे युतीत असलेल्या शिवसेनेना धक्का बसल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून उल्हासनगरमध्ये सिंधू नामकरणावरून शिवसैनिक नेहमीच रस्त्यावर उतरले आहेत. आता मात्र खुद्द मुख्यमंत्र्यांनीच मेट्रो स्टेशनला सिंधू स्टेशन नाव देणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे व्यासपीठावर बसलेले शिवसेनेचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे अवाक होऊन मुख्यमंत्र्याचे भाषण ऐकत असल्याचे दिसून आले. यावेळी रिपाइंचे राज्यमंत्री अविनाश महातेकर, ठाणे जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे, आमदार किसन कथोरे यांच्यासह आदी उपस्थित होते.