ठाणे - जिह्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीची चुरस सुरू आहे. भिवंडी तालुक्यातील निंबवली ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात असलेले शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदरवारामध्ये चक्क निवडणूक कार्यलयताच हाणामारीची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी निवडणूक अधिकारी डॉ. सुनील भालेराव यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात दोन्ही उमेदवारांविरोधात तक्रार दाखल केली. गणेश गुळवी आणि प्रवीण गुळवी असे गुन्हा दाखल झालेल्या उमेदवारांची नावे आहेत.
राष्ट्रवादीचे गणेश गुळवी तर शिवसेनेकडून प्रवीण गुळवी यांच्यात थेट लढत होत असून शिवसेनेचे प्रवीण गुळवी यांच्या गटातील काही कार्यकर्त्यांनी गावात बेकायदा बॅनर लावल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे गणेश गुळवी हे भादवड येथील निवडणूक कार्यलयात गेले होते. त्यावेळी दोघांमध्ये अचानक कार्यलयातच वाद होऊन वादाचे रूपांतर हाणामारीत झाले होते. या वेळी दोन्ही गटातील कार्यकर्ते आमनेसामने येत तुफान हाणामारी झाली.
ग्रामपंचायत निवडणुकीत ३ दिवसात ४ गंभीर घटना -
तीन दिवसांपूर्वीच काल्हेरचे शिवसेना शाखा प्रमुखावर मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात शुटरीने गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली होती. ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून गोळीबार झाल्याचा आरोप ग्रामपंचायत निवडणुकीत काल्हेर गावचे शिवसेनेचे शाखा प्रमुख दिपक म्हात्रे यांनी केला. तर त्यातच दिवशी सायंकाळच्या सुमारास गूंदवली गावात ग्रामपंचायत निवडणुकीवरून भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांच्या दोन गटामध्ये रक्तरंजित राडा झाला होता. या दोन्ही गंभीर गुन्ह्याची नोंद नारपोली पोलीस ठाण्यात दाखल आहे.
तिसरी घटना खारबाव ग्रामपंचायत हद्दीत घडली येथील एका महिला उमेदवाराची चारचाकी वाहन जाळून मतदारांमध्ये भीती निर्माण केल्याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तर काल तर चक्क निवडणूक कार्यलयातच दोन्ही उमेदवारानी जोरदार राडा केल्याने तालुक्यातील मतदारांमध्ये भीतीचे वातावरण पाहवयास मिळाले आहे.