ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दिव्यातील नवीन कामांचा शुभारंभ तसेच विकास कामांचा लोकार्पण कार्यक्रम बुधवारी सायंकाळी आयोजित केला होता. कार्यक्रम सुरू असताना रामजियावन विश्वकर्मा रा. श्लोकनगर, मुंब्रादेवी कॉलनी दिवा या 55 वर्षीय व्यक्तीला विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. शॉक लागल्यानंतर विश्वकर्मा यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
उपचारादरम्यान झाला मृत्यू : कार्यक्रमादरम्यान स्थानिक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे भाषण सुरु असताना 55 वर्षीय विश्वकर्मा यांना विद्युत शॉक लागला होता. ८ वाजून ४५ मिनिटांनी हा प्रकार घडल्याची पोलिसांकडे नोंद आहे. यावेळी खासदार कार्यक्रमात काहीही होणार नसल्याचे उपस्थितांना सांगत होते. तसेच पोलिसांनी काय झाले पाहण्याचे आवाहन करत होते. याबाबतचा व्हिडिओ समोर आला आहे. दरम्यान, जखमी विश्वकर्मा यांना त्याच्या मुलाने नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. ते चुकून एका खांबाच्या संपर्कात आल्याने तो जखमी झाले. त्या खांबातून विद्युत प्रवाह वाहत होता.
अनैसर्गिक मृत्यूची नोंद : त्या व्यक्तीला कळवा येथील नागरी रुग्णालयात नेण्यात आले होते, असे ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले. या घटनेनंतर असेही सांगितले जात आहे की, मुख्यमंत्र्यांचे पुत्र आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. पोलिसांनी याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. या कार्यक्रमासाठी मोठा जन समुदाय जमलेला होता. ही घटना घडली तेव्हा खासदार शिंदे भाषण करत होते. त्यांनी पोलीस यंत्रणेला त्या ठिकाणी तात्काळ जाण्यास सांगितले. या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात असा अनुचित प्रकार घडल्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
हेही वाचा :