ठाणे - हिरानंदानी मेडोज सोसायटीतील एका घरामध्ये घरकाम करणाऱ्या नोकराने त्याच घरातील 39 लाख रुपये किमतीच्या दागिन्यांची चोरी केल्याची घटना घडली होती. चितळसर पोलिसांनी अवघ्या 3 दिवसात या गुन्ह्याची उकल करण्यात यश मिळवले. तर या गुन्ह्यात चोरीचा 36 लाख 50 हजाराचा मुद्देमाल चितळसर पोलिसांनी झारखंड राज्यातून हस्तगत केला.
ठाण्यातील हिरानंदानी मेडोज सोसायटीच्या 21 व्या मजल्यावर राहणारे राधारमन त्रिपाठी ही गावी गेले होते. त्यानंतर त्यांच्या घरात 1 नोव्हेंबर, 2019 रोजी 39 लाखाचे सोने चांदी व इतर ऐवजांची चोरी झाली होती. त्रिपाठी गावाहून आल्यानंतर यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर 15 नोव्हेंबरला त्यांनी चितळसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. तक्रारदार यांनी आपल्या घरात चार वर्षांपासून काम करणारा नोकर हिरालाल गोराइन याच्यावर संशय व्यक्त केला होता.
या प्रकरणी गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड यांनी एक पथक तयार करून तपासाची चक्रे फिरवली. दरम्यान, पोलीस तपासात संशयित आरोपी हा झारखंड राज्यातील बोकारो जिल्ह्यात पळून गेल्याचे समोर आले. त्यानंतर चितळसर पोलीस ठाण्याचे एक पथक थेट बोकारो येथे पोहचले. चितळसर पोलिसांनी स्थानिक पोलीस, गावकरी यांच्या मदतीने मोठ्या शिताफीने आरोपी हिरालाल गोराइन यास अटक करून त्याच्या ताब्यातून 36 लाख 50 हजाराचा ऐवज हस्तगत केला. हस्तगत केलेल्या ऐवजात अडीच लाखाची रोकड, हिऱ्याचे आणि सोन्याचे दागिने यांचा समावेश असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड यांनी दिली.
हेही वाचा - उल्हासनगर महापौरपदाचा पराभव भाजपच्या जिव्हारी!