ठाणे- मकरसंक्रातीच्या दिवशी घोडबंदर रोडवरील श्री मा शाळेच्या पटांगणात वेगळाच खेळ रंगला होता. शिवसेनेच्या वतीने श्री मा शाळेच्या पटांगणात मुलांसाठी पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात कोणाच्या हातात पतंग होती तर कोणी मांजा धरून ऊभा होता. कोणी हवेचा अंदाज घेत हातातील पतंग उंच उंच उडवण्याच्या नादात होता. सगळ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत होता.
मकरसंक्रांत उत्तरायण सुरू होण्याचा संक्रमणाचा हा काळ. तिळगुळ घ्या आणि गोड बोला, असे सांगत पतंग उडवण्याचा आनंद सगळेच घेत होते. महोत्सवातील अनेकांनी तर पतंगबाजी केवळ सिनेमातून पाहिली होती. आज मात्र प्रत्यक्ष हातात मांजा आणि पतंग मिळाल्यावर त्यांच्या डोळ्यातील आनंद ओसांडून जात होता. यावेळी माजी महापौर मिनाक्षी शिंदे यानीही या महोत्सवाला भेट देऊन पतंग उडवण्याचा आनंद लुटला. त्यांच्या हस्ते महिला शिक्षकांसाठी हळदीकुंकू कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते. शिवसेना विभागप्रमुख मुकेश ठोंबरे, शाखाप्रमुख हिरानंदानी प्रवीण नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली या पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुलांना पिण्याच्या पाण्याची आठवण व्हावी यासाठी शाळेत बसवण्यात आलेल्या वॉटर बेल उपक्रमाचे देखील उद्घाटन करण्यात आले.
हेही वाचा- चालत्या रेल्वेमध्ये थरार; दरवाजात उभ्या असलेल्या महिलेची बॅग घेऊन चोरटा फरार