ठाणे - आईच्या कुशीत पहाटेच्या सुमाराला झोपलेल्या एक वर्षाच्या बालकाचे अपहरण केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडी शहरातील धामणकर नाका येथील उड्डाणपुलाखाली घडली आहे. आशिक चंदूल हरिजन, असे अपहरण झालेल्या बालकाचे नाव आहे.
याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात अपहरणकर्ता परिसरातील एका सीसीटीव्हीत कैद झाला असून पोलिसांनी या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे.
भिवंडी शहरात अल्पवयीन मुलामुलींच्या अपहरणाच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. त्यातच अपहरण झालेल्या बालकाचे वडील चंदूल रामप्यारे हरिजन हे उत्तरप्रदेशमधील फैजाबाद येथून पत्नी मुले आणि नातेवाईकांसह रोजगाराच्या शोधासाठी भिवंडीत आले आहेत. मात्र, निवासाची व्यवस्था झाली नसल्याने चंदूल याने ५ दिवसांपूर्वी धामणकर नाका परिसरातील उड्डाणपुलाखाली आपले बस्तान बसवून बूटपॉलिशचा रोजगार सुरू केला. या उड्डाणपुलाखाली २ जुनच्या मध्यरात्री सर्व कुटुंबीय झोपले असता पहाटे तीन वाजताच्या सुमारास अज्ञात अपहरणकर्त्याने आई रेणूच्या कुशीत झोपलेल्या आशिकला उचलून त्याला गोणपाट टाकून पळवून नेले.
त्यानंतर पहाटे चार वाजताच्या सुमारास रेणूला जाग आली असता आपल्या कुशीत बाळ नसल्याने तिने हंबरडा फोडीत सर्वांना उठविले. त्यानंतर या कुटुंबियांनी भिवंडी शहर पोलीस ठाणे गाठून आपल्या मुलास पळवून नेल्याबाबत तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एका ठिकाणी सदर आरोपी मुलास कडेवर गोणपाटामध्ये लपवून नेत असल्याचे आढळून आले. आता पोलीस त्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अपहरणकर्त्याचा शोध सुरू केला आहे.
या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत पवार करीत आहेत. तर दुसरीकडे या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. लहान मुलांच्या अपहरणाच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांनाकडून करण्यात येत आहे.