ठाणे - खेळता-खेळता बाथरूमध्ये गेलेल्या दीडवर्षीय चिमुरडीचा पाण्याने भरलेल्या बादलीत बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना उल्हासनगर शहरातील कॅम्प नं. ४ येथील कुर्ला कॅम्प रोड परिसरातील कालीमाता मंदीराजवळ सी. ग्रीन. रॉयल अपार्टमेंटमध्ये घडली. रिपल बिस्ट (वय - दीड वर्षे) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी, विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद दाखल करण्यात आली आहे.
उल्हासनगर शहरातील कॅम्प नं. ४ येथील कुर्ला कॅम्प रोड परिसरातील कालीमाता मंदीराजवळ सी. ग्रीन. रॉयल अपार्टमेंट आहे. अपार्टमेंटच्या तळमजल्यावर देवेंद्र बिस्ट हे आपल्या कुटूंबासह राहतात. त्यांची दीड वर्षीय मुलगी रिपल ही तळमजल्याच्या ठिकाणी बाथरूमजवळ दुपारी १२ च्या सुमारास खेळत होती. खेळता-खेळता ती बाथरूममध्ये गेली. त्याठिकाणी पाण्याने भरलेल्या बादलीत ती पडल्याने तिच्या नाकातोंडात पाणी जाऊन ती निपचीत पडली होती.
हेही वाचा - कांद्याने सामान्यांच्या डोळ्यात आणले पाणी, राज्यात कांद्याचे दराने गाठला उच्चांक
तब्बल २ तास त्या मुलीचे आई वडील तिचा शोध घेत होते. बाथरूमध्ये पाहणी केली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. यानंतर रिपलला उपचारासाठी मध्यवर्ती रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी, विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात आकस्मत मृत्यूची नोंद दाखल करण्यात आली आहे. तर अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक आर. जे. शेट्टे करीत आहेत.
हेही वाचा - उल्हासनगरमधून 5 वर्षीय चिमुरडीचे अपहरण, आरोपी 12 तासात पोलिसांच्या ताब्यात