भाईंदर Chhatrapati Shivaji Maharaj Statue : मीरा-भाईंदर शहराचं प्रवेशद्वार असलेल्या काशिमीरा नाका येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा गेली काही वर्ष दिमाखात उभा आहे. याच परिसरात गेल्या काही महिन्यांपासून मेट्रोचं काम सुरू असल्यानं सर्वत्र चिखल पसरलेला दिसतोय. त्यामुळं महाराजांच्या पुतळ्याच्या आजूबाजूला कागदी कापडाच्या आवरणाने लपेटून ठेवण्यात आलंय. महाराजाच्या पुतळ्यासमोरच एक मेट्रोचा पिलर उभारत असल्यामुळं पुतळ्याची अशी दुरवस्था झालीय.
पुतळ्याचं स्थलांतर करण्यास शिवप्रेमींचा विरोध : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुसरीकडे स्थलांतरित करण्याचा डाव महापालिका प्रशासन व स्थानिक राजकारण्यांनी मांडला असल्याचा शिवप्रेमी नागरिकांचा आरोप आहे. हा डाव यशस्वी होऊ न देण्याचा निर्धार 'मराठी एकीकरण समिती'च्या पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवलाय. शिवाय जर हा परिसर लवकर स्वच्छ केला नाही आणि पुतळा दुसरीकडे स्थलांतरित करण्याचा प्रयत्न केला तर आंदोलन करण्याचा इशारादेखील 'मराठी एकीकरण समिती'ने दिलाय. त्यामुळे हा मुद्दा आता अजूनच पेटण्याची शक्यता वाढली आहे.
शिवप्रेमींकडून संताप व्यक्त : यापूर्वी मीरा-भाईंदर शहरात जाण्यासाठी काशिमीरा येथून एकच रस्ता होता. त्यामुळे काशिमीरा नाका येथे १९९७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात आला. मीरा-भाईंदरमध्ये घोडबंदर किल्ला आणि जंजिरे धारावी किल्ला असल्याने शहराला ऐतिहासिक वारसा लाभलाय. या शहराच्या प्रवेशद्वारावर महाराजांचा पुतळा बसवल्यामुळे आणखी एक ओळख निर्माण झाली. गेल्या काही वर्षांपासून शहरातील शिवप्रेमी एकत्र येऊन प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करतात. पण मेट्रोचं काम सुरू असल्यामुळं तेथे आरती करण्याचीदेखील जागा उरलेली नाही. त्यामुळे शिवप्रेमींनी कडून संताप व्यक्त केला जातोय.
मेट्रोच्या कामामुळे पुतळा परिसरात घाणीचं साम्राज्य : गेल्या काही महिन्यांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात मेट्रोचं काम सुरु आहे. या कामामुळं पुतळा परिसरात घाणीचं साम्राज्य पसरलंय. रस्त्याच्या कडेला असलेली हॉटेल व इतर बांधकामं वाचवण्यासाठी पुतळा स्थलांतरित करण्यात येत आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. तसंच ज्या ठिकाणी पुतळा स्थलांतरित करण्यात येणार आहे, त्या ठिकाणी राजकीय पुढाऱ्यांच्या व इतर व्यावसायिकांच्या मोठं मोठ्या इमारती उभ्या राहत आहेत. तिथे फ्लॅटला जास्त दर मिळावा यासाठी पुतळा स्थलांतरित करण्याचा डाव मांडला असल्याचा शिवप्रेमींचा आरोप आहे. तसंच शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचे दोन पुतळे असले तरी काही फरक पडत नाही. पण हा पुतळा स्थलांतरित करू नये. पुतळा स्थलांतरित केला तर 'मराठी एकीकरण समिती'च्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेचे पदाधिकारी गोवर्धन देशमुख यांनी दिलाय.
१४ ऑक्टोबरला काढणार यात्रा : दरम्यान, मीरा भाईंदर मध्ये १४ ऑक्टोबर रोजी शिव शौर्य यात्रा काढण्यात येणार आहे. त्यामुळं १४ ऑक्टोबर पूर्वी पुतळा परिसरातील काम पूर्ण करावं आणि परिसर स्वच्छ करावा. अन्यथा १४ ऑक्टोबर रोजी आयुक्त यांच्या दालनात आंदोलन करण्यात येईल, असाही इशारा 'मराठी एकीकरण समिती'ने दिला आहे.
हेही वाचा -