उल्हासनगर - उल्हासनगर शहरातील धाकडे शहाड परिसरात असलेल्या सेंच्युरी रेयान कंपनीचे मुख्य अधिकारी आणि सुरक्षा रक्षकावर चाकू हल्ल्याप्रकरणी, हल्लेखोर कामगारावर गुरुवारी रात्री उशिरा कलम 370 अर्तंगत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करून हल्लेखोराला अटक करण्यात आली असून आज (शुक्रवार) त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. मात्र या आरोपी कामगारालाही कंपनीतील इतर कामगारांकडून मारहाण करण्यात आली होती. त्याबाबत पोलिसांनी अद्यापही गुन्हा दाखल केला नसल्याने, सेंच्युरी रेयान प्रकरणात पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ओमप्रकाश चितलांगे असे या हल्ल्यात जखमी झालेल्या मुख्याधिकाऱ्याचे नाव आहे. तर त्यांच्यासोबतच बाबासाहेब घाडगे नावाचा सुरक्षा रक्षक देखील या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. अरुण मसद असं या हल्लेखोर आरोपीचे नाव आहे. त्याने हल्ला केल्यानंतर कंपनीत उपस्थित असलेल्या इतर कामगारांनी त्याला मारहाण केली होती. त्यात तो जखमी झाला होता. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते, पोलिसांनी त्याला रुग्णालयातून अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोर कामगार १६ वर्षांपसून सेंच्युरी कंपनीत कामाला आहे. मात्र त्याला कंपनीच्या वसाहतीत घर पाहिजे असल्याने, त्याने अनेकवेळा कंपनी व्यवस्थापकाकडे मागणी केली होती. मात्र त्याला कंपनीच्या वसाहतीत घर न मिळाल्याने, त्याने गुरुवारी दुपारी मुख्याधिकारी चितलांगे यांच्यावर कंपनीत चाकूने हल्ला केला. त्यावेळी त्यांना वाचविण्यासाठी सुरक्षा रक्षक बाबासाहेब घाडगे आला असता त्याच्यावरही हल्लेखोराने चाकू हल्ला केला. या हल्ल्यात घाडगे गंभीर जखमी झाला. त्यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या इतर कामगारांनी आरोपीला पकडून चोप दिला, यात आरोपी जखमी झाला होता. आरोपीवर पोलिसांनी कारवाई केली. मात्र त्याला मारहाण करणाऱ्या कामगारांवर अद्याप कारवाई न झाल्याने या तपास प्रकरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.