ठाणे - वाहतूक कोंडी, प्रदूषण, खड्डे अशा नागरी समस्यांची बजबजपुरी झालेल्या ठाण्यात आता मरणही महाग झाले आहे. शहरातील ३७ स्मशानभूमींत ठेकेदारांकडून गोरगरीब मृतांच्या नातेवाईकांची लूट चालवलेली आहे. प्रत्येक सरणामागे तीन हजारांची वसुली या ठेकेदारांकडून केली जात असून दुसरीकडे मुंबई पालिकेतील स्मशानभूमींमध्ये अंत्यसंस्कार मोफत केले जातात. त्यामुळे मुंबईच्या धर्तीवर ठाण्यातही अंत्यसंस्कार मोफत करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आली आहे.
याउलट मुंबई पालिका छदामही न घेता मोफत अंत्यसंस्कार करते. ठाणे पालिका प्रशासन ठेकेदाराचे खिसे भरण्यासाठी धडपड करत असून केवळ पाच स्मशानभूमीत एलपीजी विदयुतदाहिनी सुरू आहेत. या विद्युतदाहिनी इतर ठिकाणीही सुरु कराव्यात. तसेच ठाणे शहरात सुरु असलेल्या विविध विकासकामांमध्ये तोडण्यात येणाऱ्या झाडांची लाकडं या स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी द्यावीत आणि मुंबई पालिकेच्या धर्तीवर ठाण्यातही मोफत अंत्यसंस्कार करावेत, अशी मागणी होतेय.
मृतांच्या टाळूवरील लोणी खाणे थांबवा, अन्यथा आंदोलन
उच्चभ्रू अथवा मध्यमवर्गीय ठाणेकरांना वगळले, तरीही गोरगरिबांच्या खिशात अंत्यसंस्कारासाठी इतकी रक्कम नसते. किमान त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून पालिकेने मानवतेच्या दृष्टिकोनातून मोफत अंत्यसंस्काराचा निर्णय घ्यावा. मढ्याच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार ठाणे पालिकेने न थांबवल्यास उग्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्वप्नील महिंद्रकर यांनी दिला आहे.