ठाणे - कल्याण पूर्वेतील एका खासगी रुग्णालयात रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यास त्या रुग्णांच्या नातेवाइकांना मृत्यूचा बनावट दाखल देत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खळबळजनक बाब म्हणजे मृत्यू दाखल्यावर उल्हासनगर येथील मध्यवर्ती शासकीय रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांची सही आणि शिक्का असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात शासकीय रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अरुण चंदेल यांनी साई स्वास्तिक रुग्णालयच्या तिघा डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. डॉ. स्वप्नील मुडे, डॉ. तुषार ढेंगणे, डॉ. सतीश गीते असे या त्रिकुटाचे नाव आहे.
कल्याण पूर्वेकडील आनंदवाडी परिसरात साई स्वस्तिक हे खासगी रुग्णालय आहे. काही दिवसांपूर्वी या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. यावेळी रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या मृत्यू प्रमाणपत्रावरील सही शिक्का दुसऱ्याच डॉक्टरचा होता. तो शिक्का उल्हासनगर येथील शासकीय सेंट्रल हॉस्पिटलमधील चीफ मेडिकल ऑफिसर अरुण चंदेल यांचा असल्याचे मृताच्या कुटुंबीयांच्या लक्षात आले. सुदैवाने संबंधित मृत व्यक्तीचे नातेवाईक या डॉक्टरच्या ओळखीचे असल्याने त्यांनी डॉ. चंदेल यांना मृत्यू प्रमाणपत्र दाखवले. आपल्या नावाचा गैरवापर केला जात असून डॉ. चंदेल यांचा या साई स्वस्तिक रुग्णालयाशी काहीही संबंध नसल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी डॉ चंदेल यांनी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात विनापरवानगी सही शिक्क्याचा वापर करून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची फसवणूक केली जात असल्याची तक्रार केली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी रुग्णालय प्रशासनाच्या तिघा डॉक्टराविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. आता अशा प्रकारे किती जणांची फसवणूक केली? चंदेल यांच्या शिक्याचा वापर किती ठिकाणी केला आहे? याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. तर गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागतच तिघेही आरोपी फरार झाले आहे.
दरम्यान, नगरसेवक महेश गायकवाड यांनी याच साई स्वस्तिक रुग्णालयातील गैरकारभार गेल्याच महिन्यात समोर आणला होता. या रुग्णालयात 11 दिवसांपासून एक कोरोनाबाधित महिलेवर उपचार सुरू होते. तिचे बिल जवळपास ४ लाखांच्या जवळपास आकारण्यात आले. मात्र, तिची तब्येत खालावल्यामुळे तिला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जबरदस्तीने हलवण्यात सांगितले. मात्र शिफ्ट करताना तिचा मृत्यू झाला होता. तसेच अजूनही ३ ते ४ रुग्ण या हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे मृत पावल्याचे महेश गायकवाड यांनी त्यावेळी सांगितले होते.
विशेष म्हणजे, या नंतरही दोन रुग्णांकडून जास्तीचे बिल आकारले गेल्याची तक्रार महानगरपालिका प्रशासनाकडे प्राप्त झाली होती. त्यामुळे मनपाने रुग्णालयास नोटीस पाठवून विचारणा केली होती. मात्र, रुग्णालयाने त्याचे उत्तर न दिल्याने रुग्णालयाचा परवाना मनपाने 31 ऑगस्टपर्यंत रद्द केला होता.