ठाणे - पोलीस ठाण्यासमोर शहर वाहतूक पोलिसांकडून वाहनांची तपासणी सुरू होती. या दरम्यान एका दुचाकी चालकाला वाहन परवाना व दुचाकीचे कागदपत्र जवळ नसल्याचे वाहतूक पोलिसांना आढळून आले होते. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी ऑनलाइन दंडाची रक्कम वसूल करण्यासाठी चलन दिले. मात्र, याच रागातून वाहतूक पोलिसाला मारहाण व शिवीगाळ केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यासमोरील रस्त्यावर घडली असून याप्रकरणी बाप-लेकीवर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज गुरनानी, असे गुन्हा दाखल व्यक्तीचे नाव असून त्याच्या मुलीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्याच आठवड्यात आरोपीच्या भावालाही ठोठावला होता दंड
उल्हासनगर शहर वाहतूक शाखा उपविभाग विठ्ठलवाडी यांच्या वतीने वाहतूक पोलीस गणेश चौधरी हे बुधवारी (दि. 16 डिसें.) सायंकाळी सात वाजता विठ्ठलवाडी पोलीस ठाण्या समोरील रस्त्यावर वाहनांची पाहणी व कायदेशीर कारवाई करत होते. त्याच सुमाराला एका दुचाकीवरून आलेले आरोपी मनोज गुरनानी यांच्याकडे वाहन परवाना व संबंधित कागदपत्र वाहतूक पोलीस गणेश चौधरी यांनी मागितले. मात्र, कागदपत्र जवळ नसल्याने 700 रुपयांचा दंड ठोठावला आणि त्याचे चलन दिले. यामुळे आरोपी व त्यांच्यासोबत असलेली त्यांची मुलगी संतप्त झाली. गेल्या आठवड्यातच माझ्या भावाला ही चलत दिल्याचे सांगत त्या मुलीने वाहतूक पोलिसांना शिवीगाळ सुरू केली. तसेच पोलीस नाईक चौधरी यांना मारहाण केली. यावेळी पोलीस कर्मचारी किरण धांडे व पोलीस मित्र स्वप्नील जाधव उपस्थित होते. याप्रकरणी बाप-लेकीविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
हेही वाचा - भिवंडीत आठ किलो गांजासह त्रिकुट गजाआड
हेही वाचा - 'आमदार प्रताप सरनाईकांनी घोटाळ्यातील रक्कमेतून ७८ एकर जमीन केली खरेदी'