ठाणे - शहापूर तालुक्यातील मुसई गावातील वनजमिनीची संशयास्पद कागदपत्रे बनवली. त्याआधारे वनविभागाच्या अंतर्गत येणाऱ्या जमिनीची स्वतःच्या नावे खरेदी केल्याचे भासविण्यात आले. असे करणाऱ्या कल्याणच्या एका बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध राज्य शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
हेही वाचा- भारताकडून पृथ्वी- २ क्षेपणास्त्राची आणखी एक 'नाईट टेस्ट'
मूळच्या कल्याण पूर्व येथील राहणाऱ्या या बांधकाम व्यावसायिकासोबतच शहापूर तालुक्यातील कवडास व खरीड या गावातील २ महिला आणि मुसई या स्थानिक गावातील एका व्यक्तीचा देखील यात समावेश आहे. प्रभाकर भगवान भोईर असे गुन्हा दाखल झालेल्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे.
कल्याण पूर्वेतील नेतीवली परिसरात राहणारे प्रभाकर भोईर या बांधकाम व्यावसायिकाने शहापूर तालुक्यातील मुसई येथील (गट क्र. ५७१/अ) जमीनक्षेत्र खरेदी केले. परंतु, या जमीनक्षेत्राची महसूल संहितेच्या कागदपत्रांच्या नोंदीत महाराष्ट्र शासन राखीव वने अशी नोंद आहे. मात्र, संशयास्पद दस्तावेज सादर करून ११ डिसेंबर २०१५ रोजी ५८८५/२०१५ या क्रमांकाचा दस्त खरेदी दप्तरी नोंद करण्यात आला. प्रत्यक्षात वनसंवर्धन अधिनियम १९८० च्या तरतुदीनुसार वनजमिनीची खरेदी अथवा विक्री करता येत नाही, असे असतानाही शहापूर दुय्यम निबंधक कार्यालयात (गट क्र. ५७१/अ) या वनजमिनीचा खरेदी दस्त नोंद करण्यात आला.
विशेष म्हणजे तब्बल पाच वर्षानंतर सामाजिक कार्यकर्ते राजेश लोखंडे यांनी वेळोवेळी केंद्रीय माहितीचा अधिकार कायद्यान्वये माहिती मिळवून या प्रकरणाचा पाठपुरावा केला. त्यामुळे हे फसवणुकीचे प्रकरण समोर आलेल्या दुय्यम निबंधक इंद्रवदन सोनावणे यांनी तत्परतेने शहापूर पोलिसांना कळवले. त्यांनी नोंदणी अधिनियम १९०८ चे नियम ८२ नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
दरम्यान, दुय्यम निबंधकांच्या तक्रारीनुसार प्रभाकर भोईर या बांधकाम व्यावसायिकासोबतच लहु लखू कुडव, (रा. मूसई) विठाबाई भास्कर गोळे, (रा. कवडास) रंजनाबाई रामचंद्र गगे, (रा. खरीड) या ३ सहकाऱ्यांविरुद्ध शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलीस उपनिरीक्षक निलेश कदम यांनी सांगितले.