ठाणे- दुचाकीने कर्तव्यावर निघालेल्या कर्मचाऱ्यांना कारने धडक दिली आहे. भिवंडीतील मुंबई-नाशिक रोडवर हा अपघात झाला आहे. या घटनेत दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी आहे.
दुचाकीवरील कर्मचारी कर्तव्यावर जात असताना मुंबईकडून येणाऱ्या आर्टिका कार चालकाने अचानक वळण घेतल्याने दुचाकीला जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन कंत्राटी कामगाराचा जागीच मृत्यू झाला. पंढरीनाथ वामन चौधरी (३६ रा.आंबेटेंभे ,मुरबाड), मिलिंद बाबू खंदारे (२४ रा.मोहने) अशी मृत कर्मचाऱ्यांची नावे आहेत. तर संदिप दशरथ धोत्रे (२९ रा.आंबिवली) असे जखमी कर्मचाऱ्याचे नाव आहे. जखमी कर्मचाऱ्याला बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी कल्याणच्या रुक्मिणी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
पंढरीनाथ, मिलिंद, संदिप हे ठाणे महापालिकेत स्वच्छता विभागात कंत्राटी कामगार होते. ते रोजच्या प्रमाणे मुंब्र्यात कामासाठी निघाले होते. दरम्यान, माणकोली ब्रिजलगतच्या अंजूर पेट्रोल पंपासमोर औरंगाबादसाठी निघालेल्या कारने अचानक वळन घेऊन त्यांना धडक दिली. प्रशांत सूर्यकांत इंगळे (३० रा.कुर्ला, मुंबई ) असे कार चालकाचे नाव आहे. चालकाविरुद्ध नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगांव टोल नाका ते वडपे बायपास नाका या दरम्यान अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे वाढते अपघात टाळण्यासाठी राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने उपाय योजना कराव्यात, अपघात मुक्त महामार्ग निर्माण करावा, अन्यथा भाजपच्या वतीने रास्ता रोको आंदोलनचा इशारा प्रदेश सचिव दयानंद चोरघे यांनी दिला आहे.