ठाणे : राज्यात आगीच्या घटनांची संख्या वाढताना दिसत आहे. यादरम्यान ठाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाण्याच्या उथळसर परिसरातील महामंडळाची बस इंजिनच्या तांत्रिक बिघडामुळे पेट घेतला. या बसेस मधून प्रवास करणाऱ्या तब्बल ६५ प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. ही घटना मंगळवारी ३ जानेवारी रोजी सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास घडली. बसच्या इंजिनमध्ये शॉर्टसर्किटने आग लागल्याचे समोर आले आहे.
शॉर्टसर्किटमुळे बसने घेतला पेट : ठाणे आपत्ती व्यवस्थापनाला मिळालेल्या माहितीच्या आधारे उथळसर प्रभाग समिती जवळ, दर्ग्या समोर, उथळसर रोड, उथळसर, ठाणे (प.) येथे हा प्रकार घडला. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भिवंडी डेपोची बस उथळसर येथून भिवंडीकडे निघालेली होती. सदरची राज्य परिवहन महामंडळाची बस चालक आनंद विठोबा सवारे आणि वाहक अजित नामदेव कांबळे हे ६५ प्रवाशी घेऊन निघाले होते. दरम्यान बस उथळसर प्रभाग समिती जवळ येताच बसच्या इंजिनमध्ये शॉर्टसर्किट होऊन बस पेटली.
आगीवर नियंत्रण : बस पेटल्याची चाहूल लागताच बस चालक आणि वाहक प्रसंगावधनाने बसमधील ६५ प्रवाशांना सुखरूप खाली उतरविण्यात आले. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. पेटलेल्या बसमधील चालक, वाहक, स्थानिक रहिवाशी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने पूर्णपणे विझवून आगीवर नियंत्रण मिळवले.