ठाणे - कल्याण रेल्वे स्थानक परिसरात सोमवारी (१ मार्च) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास एक चपलेच्या दुकानाला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली होती. आता ५ दिवसानंतर या आगीत एकाचा होरपळून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. सदर दुकानाची साफसफाई करताना तेथे कोळसा झालेला मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ माजली आहे.
कल्याण स्थानकासमोरील एका चप्पल-बूट विक्री-दुरुस्तीच्या दुकानाला भीषण आग लागली होती. तासाभरात अग्निशमन विभागाने ही आग आटोक्यात आणली. घटना घडल्याच्या पाच दिवसांनंतर गुरुवारी दुपारच्या सुमारास या दुकानाचा मालक साफ-सफाई करण्यासाठी दुकानात गेला असता त्याला जळालेल्या सामानात एक मृतदेह आढळून आला. जळालेल्या अवस्थेत असलेल्या मृतदेहाबाबत महात्मा फुले चौक पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी हा मृतदेह ताब्यात घेतला. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर सदर मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता मुंबईतील जे. जे. हॉस्पिटलकडे पाठविला आहे. व्हिसेरा आणि डीएनए चाचण्यांनंतर या व्यक्तीची ओळख पटू शकते. मात्र, या मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे.
मृत्यू अपघाताने झाला की हा घातपाताचा प्रकार?
ही व्यक्ती दुकानात गेली कशी? आगीची घटना घडल्यानंतर तब्बल सात दिवसांनी मृतावस्थेत आढळलेली ही व्यक्ती कोण होती, याची चौकशी तपास पोलिसांनी सुरू केला आहे. तर, दुसरीकडे आगीची घटना घडल्यानंतर तब्बल सात दिवसांनी या दुकानात जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने स्थानिक पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. मात्र, ज्या मालकाचे हे दुकान आहे त्याने गेल्या 5 दिवसांत दुकान का उघडले नाही? मृत व्यक्ती दुकानदाराशी संबंधित असावी का? या व्यक्तीचा मृत्यू अपघाताने झाला की, हा घातपाताचा प्रकार आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.
मृतदेह 10 ते 12 वर्षीय मुलाचा
रविवारी दुपारनंतर हाती आलेल्या माहितीनुसार सदर मृतदेह 10 ते 12 वर्षीय मुलाचा असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. खळबळजनक बाब म्हणजे या परिसरात गर्दुल्ल्यांचा मोठा वावर असतो. गर्दा ओढण्यासाठी हे गर्दुल्ले लहान-मोठ्या चोऱ्यामाऱ्याही करत असतात. चोरीच्या उद्देशाने एखादा गर्दुल्ला दुकानात घुसला असावा. गर्दा ओढण्यासाठी लागणारी विडी पेटवताना भडका उडून तेथे आग लागली असावी आणि या आगीत हा अल्पवीयन मुलगा होरपळून ठार झाला असावा, असाही कयास बांधण्यात आला आहे. पोलिसांनी आता त्या दिशेनेही तपासाची दिशा दिली आहे.