ठाणे - कल्याण पश्चिम भागातील रामबाग परिसरात मेन रोडवर असलेल्या तीन दुकानांना भीषण आग ( Fierce fire at kalyan ) लागण्याची घटना घडली आहे. या आगीत दुकानात विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या शेकडो पक्षी, प्राणी, मासे जळून खाक झाले आहेत.
बहुतांश पक्ष्यांसह प्राण्यांना वाचविण्यात यश -
कल्याण पश्चिमेच्या रामबाग परिसरात विविध पाळीव पक्षी, प्राणी व मासे विक्रीची दुकाने आहे. त्यातच आज सकाळच्या सुमारास एका दुकानात अचानक आग लागली होती. या आगीने काही क्षणातच भीषण रूपधारण केल्याने त्या दुकानाच्या लगत असलेली आणखी दोन दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आगीच्या घटनेची माहिती मिळताच कल्याण डोंबिवली अग्निशमन दलाचे २ बंब घटनास्थळी दाखल होऊन तासाभरात आगीवर नियंत्रण मिळविले. विशेष म्हणजे भीषण आगीतूनही अग्निशमन दलाच्या जवानांनी बहुतांश पक्ष्यासह प्राण्यांना वाचविण्यात यश आले.
आगीचे कारण अस्पष्ट -
आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या या दुकानांत कबतूर, पोपट, लव्हबर्ड आदी रंगीबेरंगी पक्षासह ससे पिंजऱ्यात बंद करून विक्री केली जात होती. तर फिशटंकमधील विविध जातीचे मासे पाण्याने भरलेल्या काचेच्या पेटीत विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण मात्र समजू शकले नाही. तर आगीच्या घटनेची नोंद महात्मा फुले पोलीस ठाण्यात करण्यात केली आहे. या घटनेची सविस्तर चौकशी पोलीस करत आहेत.