ठाणे - २५ डिसेंबरपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह चाविंद्रा येथे निर्जनस्थळी शुक्रवारी आढळला. हा मृतदेह छिन्न विच्छिन्न अवस्थेत होता. कृष्णा केशरवाणी (२८ ) असे मृतदेह आढळून आलेल्या तरुणाचे नाव असून तो भिवंडी शहरातील घुंगट नगर परिसरातून बेपत्ता झाला होता. याप्रकरणी सोहेल खान या भंगार विक्रेत्याला अटक करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मृतक व आरोपी दोन्ही भंगार विक्रीचा व्यवसाय करीत होते. याच व्यवसायच्या वादातून कृष्णा केशरवाणी याची निर्घृण हत्या सोहेल खान याने केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
डीसीपी कार्यलयासमोर आंदोलन -
कृष्णा केशरवाणी हा शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजता घुंगट नगर येथून भंगार खरेदी करण्यासाठी निघाला. परंतु तो परत आला नाही. रात्री उशिरापर्यंत कुटुंबियांनी त्याचा शोध घेतला. पण तो न सापडल्याने त्यांनी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली. त्याचा सर्वत्र शोध सुरू असतानाच भिवंडी तालुक्यातील चिंबीपाडा या आडवाटेच्या रस्त्यावर त्याची दुचाकी आढळून आल्याने त्याच्या घरच्यांची धास्ती वाढली. पोलिसांनी आपल्या मुलाचा तत्काळ शोध घ्यावा, यासाठी कुटुंबियांसह शेकडो नागरिकांनी पोलीस उपायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन केले होते.
आर्थिक नुकसान करायचे म्हणून हत्या -
भिवंडी शहर पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी सोहेल खान या भंगार व्यवसायिकास ताब्यात घेत त्याकडे कसून चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली. कृष्णा हा सोहेल खानकडून चोरीचे भंगार खरेदी करायचा. परंतु व्यवहार न पटल्यास पोलिसांना खबर देऊन माझा माल पकडून देऊन आर्थिक नुकसान करायचा. या रागातून त्याने ही हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.
निर्जन ठिकाणी केली निर्घृण हत्या -
मृतदेह चाविंद्रा गावाच्या हद्दीत यंत्रमाग कारखान्याच्या पुढे असलेल्या निर्जन ठिकाणी आणून टाकल्याचे सांगितल्यावर पोलिलांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्या ठिकाणी मृतदेहाचे शीर व पायाचे काही अवशेष कुजलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून न्यायिक शवविच्छेदनासाठी मुंबई येथे पाठविला आहे.