ठाणे - नोकरांसमोर अपमानीत करून, इच्छेविरुद्ध दुकानाचे कामकाज करतो, या रागातून लहान भावाने मोठ्या भावाची हत्या केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ठाण्यातील कोपरी मार्केटमध्ये घडली. महेश रतनमल चावला (48) (रा. किशोरनगर,कोपरी) असे मृताचे नाव आहे. दुकानातील वजनदार लोखंडी साधनाने डोक्यावर तीन ते चार प्रहार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
याप्रकरणी, कोपरी पोलिसांनी मृताचा लहान भाऊ अनिल रतनमल चावला (45), नोकर शोबीत उर्फ पिचकु सिंग (19) आणि अभय उर्फ गोरे अग्नीहोत्री (19) या तिघांना अटक केली. हत्येनंतर अनिल याने शिडीवरून पडल्याने भावाचा मृत्यू ओढवल्याचा बनाव रचला होता. मात्र, तपासात बिंग फुटल्याने काही तासातच हत्येचा उलगडा करण्यात कोपरी पोलिसांना यश आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दत्ता गावडे यांनी दिली.
ठाणे पूर्वेकडील कोपरी, गावदेवी मंदिरसमोर चावला बंधुंचे मे.रतन सुपरमार्केटमध्ये तळ अधिक एकमजली दुकान आहे. दुकानाच्या दुसऱ्या मजल्यावर आरोपी अनिल चावला राहतो. तर, दुकानासमोरील किशोरनगरमध्ये मृत भाऊ महेश हा पत्नी व दोन मुलांसह राहतो. दुकानात दोन कॅश काऊंटर केल्याने महेशचे अनिलशी वारंवार खटके उडत. दुकानातील नोकरांसमोर अपमानीत व्हावे लागत असल्याचा राग मनात धरून अनिलने 2 जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास नोकरांना दुकानात बोलवून, संधी साधत महेश यांच्या डोक्यावर लोखंडी वस्तूने प्रहार करुन त्याची हत्या केली. अतीरक्तस्त्राव झाल्याने महेश जागीच ठार झाल्यानंतर अनिलने दुकानाच्या शिडीवरून पडून महेशचा मृत्यू झाल्याचा बनाव रचला. मात्र, तपासणीत बिंग फुटल्याने तिघांनीही हत्येची कबुली दिली. याप्रकरणी, सख्खा भाऊ व दोन नोकरांना पोलिसांनी अटक करून ठाणे न्यायालयात हजर केले असल्याची माहिती पोलीस निरिक्षक दत्ता गावडे यांनी दिली.