ठाणे - मंगळवारपासून (दि. 4 ऑगस्ट) कोसळणाऱ्या पावसामुळे कल्याण तालुक्यातील भातसा, काळू व उल्हास या तिन्ही नद्यांना पूर आला आहे. पाऊस असाच कोसळत राहिला तर सायंकाळपर्यंत काळू नदीवरील पूल पाण्याखाली जाऊन या भागातील 12 गावाचा संपर्क तुटण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
कल्याण तालुक्यातील रुंदे गावाजवळून वाहणाऱ्या काळू नदी पात्रातील पाण्याच्या पातळीत पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे नदीवरील पूलाला पाणी लागले आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास रुंदे, फळेगाव, आंबिवली, मढ, उशीद, हाल, पळसोली, काकडपाडा, भोंगलपाडा, आरेले, दानबाव आदी 10 ते 12 गावांचा शहराशी संपर्क तुटण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, भिवंडी तालुक्यातील खडवली-पडघा मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. तसेच भातसा नदीला आलेल्या पुरामुळे खडवली नदीकाठच्या इंदीरानगर, ज्यु, आदीवासी आश्रम शाळा परीसर, स्वामी समर्थ मठ परीसर येथील 70 ते 80 घरात पुराचे पाणी शिरले आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, या परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलिवण्यात येत आहे.
तसेच उल्हास व भातसा या नदीच्या पाण्याच्या पात्रातदेखील कमालीची वाढ झाली आहे. यामुळे रायतेजवळील उल्हास नदीवरील पूल, भातसा नदीवरील खडवली येथील पूल व काळू नदीवरील वासुंद्री गावाजवळील पुलाला देखील पाणी लागण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.