ठाणे - मीरा भाईंदर शहरातील अनधिकृत बार आणि लाँजिगवर तोडक कारवाई करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. या अतंर्गत १३५ बार आणि लाँजिगला नोटीस पाठवण्यात आली असून त्यांच्यावर तोडक कारवाई करण्यात येत असल्याची माहिती महापालिका उपायुक्त अजित मुठे यांनी दिली.
कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या काळात सर्व कामे आणि व्यवहार ठप्प होते. मात्र याच टाळेबंदीचा फायदा घेत शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे करण्यात आली. अनधिकृत बांधकामे करण्यात सर्वात पुढे राहिले आहेत ते हॉटेल, बार आणि लॉजिंग-बोर्डिंगच मालक. महापालिका हद्दीतील दिल्ली दरबार हॉटेलपासून दहिसर चेक नाका आणि मीरा-भाईंदर रोड या परिसरात मोठ्या प्रमाणावर लॉजिंग-बोर्डिंग व लेडीज बार आहेत. येथील लॉजमध्ये अनधिकृतरित्या छुप्या खोल्या बांधण्यात आल्याच्या तक्रारी महापालिकेला प्राप्त झाल्या आहेत. आता राज्य शासनाने हॉटेल्स सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे शहरातील लॉजिंग-बोर्डिंगमध्ये तयार करण्यात आलेल्या अनधिकृत खोल्यांमध्ये अनेक गैरप्रकार सुरू होतील अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे महापालिकेने प्रभागनिहाय अनधिकृत बांधकाम करण्यात आलेल्या हॉटेल्सची यादी तयार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्या सूचनेप्रमाणे महापालिकेमार्फत शहरातील १३५ बार आणि लाँजिगला नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्याचप्रकारे नगररचना विभागामार्फत हॉटेलच्या आराखड्याची माहिती घेऊन आणि अग्निशमन दलाची परवानगी तपासून कारवाई सुरु करण्यात आली आहे.