ठाणे - या शहराला सांस्कृतिक शहर म्हणूनही ओळखले जाते. वेगवेगळे सण उत्सव या ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिवर्षी साजरा होणार दिवाळी पहाटचा कार्यक्रम यंदा मात्र, आगळ्यावेगळ्या पध्दतीने साजरा करण्यात आला. दरवर्षी ठाण्याच्या राम मारुती रोड तसेच मासुंदा तलाव येथे हजारो तरुणाई एकत्र येऊन डीजेच्या तालावर थिरकत असतात. मात्र यावर्षी कोरोनाचे सावट असल्याने यंदा आयोजकांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात शेकडोहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करत आगळीवेगळी दिवाळीची सुरुवात केली.
रक्ताची टंचाई दूर -
दिवाळीची पहिली आंघोळ झाली की मित्र-मैत्रीणींसह दिवाळी साजरी करण्यासाठी सगळी तरुणाई ठाण्यातील तलावपाळीला जमा होत असते. त्यानंतर संगीताच्या तालावर आधुनिक ध्वनियंत्रणेसमोर थिरकत असते. यंदा मात्र, कोरोनाच्या संकटामुळे अशा प्रकारच्या सेलिब्रेशनच्या पंरपरेला खंडीत करण्यात आले. मात्र दिवाळीचा कार्यक्रम आगळ्यावेगळ्या पद्धतीने पार पाडला. त्यासाठी सध्याच्या काळात सगळीकडे आढळणारी रक्ताची टंचाई दूर करण्यासाठी रक्तदान शिबीर तलावपाळी येथे आयोजित करण्यात आले होते.
कोरोना काळात रक्तदानाला महत्व-
ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दिवाळीच्या दिवसात रक्तदानसारखे महान कार्य करून आपण एखादा जीव वाचवू शकतो, म्हणून आम्ही रक्तदान करून एक अनोखी दिवाळी साजरी केली, असे तरुण मंडळी यावेळी संगितले. आज ज्या ठिकाणी रक्त दान झाले याच ठिकाणी सकाळपासून डीजे आणि संगीताचे कार्यक्रम असतात, तेव्हा हजारों युवक या कार्यक्रमात सहभागी होत असतात. मात्र या वर्षी कोरोना संकट लक्षात घेवून रुग्णांना आवश्यक असलेले रक्तदान हीच खरी दिवाळी असल्याचे युवकांनी रक्तदान करुन दाखवून दिले.