ठाणे : उजवा पाय आणि दोन्ही हातांची बोटं यात कायमस्वरूपी व्यंगत्व असताना देखील अपार कष्ट आणि जिद्दीच्या बळावर आज ठाण्याचा २१ वर्षीय प्रणव देसाई याने ठाण्याचा झेंडा अटकेपार फडकवला आहे. परिस्थितीवर मात करून त्याने ठाणे महानगरपालिकेच्या दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलन प्रशिक्षक निलेश पाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली कसून सराव सुरू केला. ऍथलेटिक्स या क्रीडा प्रकारात ब्लेड रनर प्रणवने १०० मीटर व २०० मीटर राज्यस्तरीय धावण्याच्या स्पर्धेत दोन सुवर्ण आणि एक रौप्य पदकाची कमाई केली.
प्रणवचे सुवर्णयश : पॅरिस येथे या महिन्यात होणाऱ्या पॅराएथलेटिक्स आणि ऑक्टोबर महिन्यात चीनमध्ये होणाऱ्या आशियाई पॅरागेम्ससाठी त्याची निवड झाली आहे. यामुळे त्याला आणि त्याच्या कुटुंबीयांना घेतलेल्या कष्टाचे चीज झाले असे वाटत आहे. राष्ट्रीय स्पर्धेत पाच सुवर्णपदके तर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दोन सुवर्ण आणि एक रौप्य पदक त्याने पटकवली आहेत. 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत राज्यस्तरीय दोन सुवर्ण, राष्ट्रीय स्पर्धेत एक सुवर्ण, चार रौप्य पदके, एक कांस्य पदक आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तीन सुवर्णपदके अशी एकूण 16 पदक मिळवून प्रणवने घवघवीत यश संपादन केले. त्याच्या या असामान्य कामगिरीची दखल घेत प्रशासनाने 2021-22 यावर्षीचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार त्याला देण्याचे जाहीर केले आहे.
ब्लेड रनर म्हणजे काय - ब्लेड रनर म्हणजे एका अथवा दोन्ही पाय नसलेल्या खेळाडूने ब्लेड सारखे उपकरण लावून धावणे. पाय नसतानाही त्यामुळे चांगल्या प्रकारे धावता येते. मात्र कृत्रिम अवयव असल्याने तोल सांभाळण्याची कलाही यातून अवगत करावी लागते. त्यामध्ये नैपुण्य मिळवणे हे मोठ्या धाडसाचे काम असते.
पालिका प्रशासनाची मदत आणि कौतुक : प्रणव देसाई याच्या कामगिरीबद्दल ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी देखील त्याचे आणि प्रशिक्षक निलेश पाटकर यांचे भरभरून कौतुक केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तत्कालीन महापालिका आयुक्त संजय जयस्वाल यांनीदेखील प्रणवला नेहमीच मदतीचा हात दिला, असे त्याच्या वडिलांनी आवर्जून सांगितले.
प्रणवच्या वडिलांनी मानले आभार : ठाणे महानगरपालिकेच्या दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलातील अकॅडमीमध्ये प्रशिक्षक निलेश पाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रणव कसून सराव करतो. महानगरपालिकेच्या वतीने केल्या गेलेल्या मदतीने भारावलेले प्रणवचे वडील प्रशांत देसाई यांनी आयुक्तांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. याप्रसंगी प्रणवला सातत्याने त्याच्या क्रीडा प्रकारांमध्ये मदत करणारे माजी महापौर अशोक देखील उपस्थित होते. प्रशिक्षक निलेश पाटकर यांनी असेच मेहनतीने खेळाडू घडवून ठाणे शहराचे नाव उज्वल करावे असे मनोगत आयुक्त अभिजीत बांगर यांनी व्यक्त केले.
हेही वाचा: