नवी मुंबई - नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने सन्मानपूर्वक जागा न दिल्यास आरपीआय स्वबळावर निवडणूक लढवेल, असा इशारा पनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाड यांनी दिला आहे. नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाशीत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
युतीत योग्य सन्मान राखला जावा
आरपीआय आणि भाजप यांची युती आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणूक ही आम्ही एकत्रित लढवू, त्यासाठी दोन्ही पक्षांकडून चर्चा सुरू आहे. त्यामुळे युतीमध्ये आरपीआयचा योग्य सन्मान राखला जावा, आम्हाला योग्य जागा देण्यात याव्यात, अन्यथा आम्ही स्वबळावर निवडणूक लढवू असा इशारा यावेळी गायकवाड यांनी दिला आहे.
जागा वाटपावर चर्चा
नवी मुंबई महापालिकेची निवडणूक महाआघाडी एकत्र लढवणार आहे, त्या पार्श्वभूमीवर आरपीआय आणि भाजप यांच्यात देखील युतीबाबत चर्चा सुरू आहे. 111 पैकी 16 जागांची चर्चा दोन्ही पक्षांमध्ये झाली आहे. त्यातील निदान 12 जागा तरी आम्हाला देण्यात याव्यात व आम्ही ज्या उमेदवारांचे नाव घोषित करू त्याला उमेदवारी द्यावी, अशी मागणी देखील यावेळी गायकवाड यांनी केली आहे.
नवी मुंबईत आरपीआयचा उपमहापौर व्हावा
जर नवी मुंबई महापालिका निवडणूक भाजप आणि आरपीआयने एकत्रीत लढवली आणि भाजपचा महापौर झाल्यास पनवेल पॅटर्नप्रमाणे आरपीआयचा उपमहापौर झाला पाहिजे, अशी मागणी देखील यावेळी गायकवाड यांनी केली आहे. या पत्रकार परिषदेला राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुमंत गायकवाड, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष सिद्राम ओहोळ, महिला अध्यक्ष शिला बोदडे यांची उपस्थिती होती.