ठाणे - एकामागून एक घोटाळे बाहेर पडत असल्याने ठाकरे सरकार घाबरले आहे. त्यामुळेच भाजपसह इतर विरोधकांवर दबाव आणण्यासाठी विरोधकांची सुरक्षा काढून घेतल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमैया यांनी केला आहे. किरीट सोमैया हे एका घोटाळ्याचा पाठपुरावा करणासाठी टिटवाळ्यात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना राज्यातील महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकाही केली.
यापूर्वी देखील त्यांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या पत्रकारांना, सामाजिक कार्यकर्त्यांना जेल मध्ये टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र भाजपचा कोणताही कार्यकर्ता ठाकरे सरकारला भीक घालत नाही, असे सांगत किरीट सोमैया यांनी ठाकरे सरकारची खिल्ली उडविली.
आमदार सरनाईक यांची जमीन ईडीने केली जप्त ...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उजवा हात समजला जाणाऱ्या आमदार प्रताप सरनाईक यांचा तिसरा घोटाळा समोर आला आहे. आमदार सरनाईक यांनी १०० कोटींचा जो घोटाळा केला. त्यामधून त्यांनी कल्याण तालुक्यात टिटवाळ्या नजीक 78.27 एकर जमीन खरेदी केली होती. आता ही संपूर्ण जमीन ईडीने जप्त केली आहे. तसेच देशातील नागरिकांची सुरक्षा आमच्या दृष्टीने महत्वाची असल्याचेही सोमैया यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
आमदार प्रताप सरनाईक यांची व त्यांच्या मुलांची सध्या ईडीकडून चौकशी सुरू आहे. प्रताप सरनाईक यांनी कंगनाला थोबाडीत मारण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर काही दिवसातच प्रताप सरनाईक यांना ई़डीकडून नोटीस मिळाली होती.