ठाणे - नवी मुंबईत कोरोनाच्या जैविक कचऱ्यासंबंधी प्रश्न उपस्थित झाला आहे. चार खासगी कोविड रुग्णालयं जैविक कचरा सर्वसामान्य कचरा कुंडीत टाकत असल्याने हा प्रश्न समोर आलाय, तर पालिकेने वर्क ऑर्डर न काढल्याने हा जैविक कचरा महापालिका रुग्णालयात साचला आहे.
नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना शहरातील चार खासगी कोविड रुग्णालयांकडून जैविक कचरा चक्क सर्वसामान्य कचरा कुंडीत टाकण्यात येतो. या कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली जात नाहीय. त्यामुळे कचरा सर्वसामान्यांमध्ये पसरण्याची आणि प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता समोर येत आहे.
या चार खासगी रुग्णालयांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार झाला आहे. मात्र, आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचे आणि रुग्णालयाचं साटलोटं असल्याने कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
महापालिका रुग्णालयात परिस्थिती आणखी बिकट
महापालिकेच्या कोविड रुग्णालयातील जैविक कचरा उचलला जात नाही. पाच-पाच दिवस हा जैविक कचरा असाच पडून असतो. कचरा उचलणाऱ्या 'मुंबई वेस्ट मॅनेजमेंट' या कंपनीला मागील पाच महिन्यांपासून वर्क ऑर्डर न दिल्याने जैविक कचरा रुग्णालयात डॉक्टर आणि नर्स यांच्या चेंजिंग रूम शेजारी साचला आहे. नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून जैविक कचरा उचलणाऱ्या या कंपनीचे 40 लाखांहून अधिक थकबाकी आहे. मनपाने अद्याप या कंपनीचे पैसे दिले नाहीत. तरीही पाच महिने कंपनी स्वखर्चाने कचरा व्यवस्थापन करत आहे.