भिवंडी (ठाणे) : Bhiwandi Building Collapsed : ठाण्याच्या भिवंडी शहरातील गौरीपाडा साहील हॉटेल परिसरात एका दोन मजली इमारतीचा काही भाग मध्यरात्री कोसळला. आतापर्यंत या दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू झाला असून ३ ते ४ जण गंभीर जखमी आहेत. मृतांमध्ये आठ महिन्याच्या बालकाचाही समावेश आहे.
इमारत ४० वर्षांहून अधिक जुनी आहे : शहराच्या गौरीपाडा धोबी तलाव इथल्या साहिल हॉटेल परिसरातील 'अब्दुल बारी जनाब' इमारत ४० वर्षांहून अधिक जुनी आहे. ही इमारत धोकादायक इमारतींच्या श्रेणीत येते. इमारतीच्या तळमजल्यावर यंत्रमाग कारखाना असून वरचे दोन मजले निवासी आहेत. या इमारतीच्या मागील बाजूचा स्लॅब मध्यरात्रीच्या सुमारास अचानक कोसळला. या दुर्घटनेत पहिल्या मजल्यावरील कुटुंब ढीगाऱ्याखाली दबलं गेलं.
जखमींना रिक्षातूनच रुग्णालयात नेलं : घटनेची माहिती मिळताच भिवंडी अग्निशामक दलासह ठाणे येथील टीडीआरएफचं पथक बचावकार्यासाठी पोहचलं. त्यानंतर बचाव पथकानं स्थानिक नागरिकांच्या मदतीनं ढीगाऱ्याखाली दबलेल्या एकूण सात रहिवाशांना बाहेर काढलं. सुरवातीला रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न झाल्यानं ढिगाऱ्याखालून काढलेल्या जखमी रहिवाशांना रिक्षातूनच रुग्णालयात नेण्यात आलं.
इमारतीचा मलबा हटविण्याचं काम जारी : सध्या घटनास्थळी मदतकार्य सुरू असून, अद्यापही ढिगाऱ्याखाली कोणी रहिवाशी दबले आहेत का, याचा शोध सुरू असल्याची माहिती अग्निशमन अधिकारी सुधाकर पवार यांनी दिली. दुर्घटनाग्रस्त इमारत दाटीवाटीच्या परिसरात असल्यानं मदतकार्यात अडथळा येत आहे. सध्या घटनास्थळी इमारतीचा मलबा हटविण्याचं काम जारी आहे.
चौथ्या मजल्याचा स्लॅब कोसळून महिलेचा मृत्यू : अंबरनाथ पश्चिम येथे शनिवारी सकाळी अशीच एक घटना घडली. शहरातील फातिमा शाळेजवळ, 'अण्णा अपार्टमेंट' नावाच्या जुन्या इमारतीच्या चौथ्या मजल्याचा स्लॅब कोसळला. या घटनेत एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून आणखी एक महिला किरकोळ जखमी आहे.
हेही वाचा :