ठाणे - भिवंडी तालुक्यातील तीनही मतदारसंघातील लढतीचे चित्र अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी समोर आले. विशेष म्हणजे भिवंडी पूर्व आणि भिवंडी ग्रामीण मतदारसंघात शिवसेनेच्या विद्यमान आमदारांसमोर भाजपच्या दोन मात्तबरांनी बंडखोरी करत आघाडीच्यावतीने उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या दोन्ही आमदारांविरुद्ध कडवी झुंज असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भिवंडी पूर्व मधून भाजपचे आमदार महेश चौघुले यांना काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष शोहेब गुड्डू यांनी कडवे आव्हान दिले आहे. विशेष म्हणजे या मतदारसंघात जवळपास ३५ टक्के मुस्लिम मतदार आहेत. भिवंडी शहरात हिंदू-मुस्लिम उमेदवार उभे करून काँग्रेसने जातीच्या समीकरणावर भर दिल्याचे दिसून आले आहे. तसेच भिवंडी महापालिकेत काँग्रेसची एका हाती सत्ता असून त्यांचे ४७ नगरसेवक आहेत.
भिवंडी पूर्वमधून सेना-काँग्रेसमध्ये 'काटे कि टक्कर'
भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघातून शिवसेना-काँग्रेस या प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांमध्ये 'काटे कि टक्कर' निश्चित झाली आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण पाच उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात शिल्लक राहिले आहेत.
रुपेश लक्ष्मण म्हात्रे - शिवसेना , संतोष मंजय्या शेट्टी- काँग्रेस , रईस कासम शेख- समाजवादी पक्ष या प्रमुख राजकीय पक्षांसह नोंदणीकृत राजकीय पक्षांचे सहा व चार अपक्ष उमेदवार शिल्लक राहिले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ४ अपक्षांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. आता खरी लढत शिवसेना भाजप महायुतीचे रुपेश म्हात्रे व काँग्रेसची उमेदवारी मिळवलेले भाजपचे बंडखोर जिल्हा अध्यक्ष संतोष शेट्टी यांच्यात आहे. विशेष म्हणजे २०१४ मधील विधानसभा निवडणुकीतील याच उमेद्वारांमध्येच पुन्हा एकदा लढत पाहावयास मिळणार आहे.
भिवंडी ग्रामीणमध्ये शिवसेनेसमोर राष्ट्रवादीचे आव्हान
भिवंडी ग्रामीण तालुक्यासह वाडा शहरापर्यंत विस्तारलेल्या मतदारसंघात महायुतीला सुरुवातीला ही निवडणूक नगण्य वाटायची. मात्र, पूर्वाश्रमीच्या शिवसेनेच्या पंचायत समिती सभापती तर त्यानंतर भाजपातून इच्छुक असणाऱ्या माधुरी शशिकांत म्हात्रे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे या निवडणुकीत रंगात वाढली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या कालावधीत भाजपचे पदाधिकारी संतोष जाधव, महादेव घाटाळ या दोन अपक्षांसह एकूण सहा जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने एकूण सात उमेदवार रिंगणात राहिले आहेत.
शांताराम मोरे-शिवसेना, माधुरी शशिकांत म्हात्रे- राष्ट्रवादी, म्हसे नितेश जगन- भारतीय कम्युनिस्ट पक्ष, शुभांगी रमेश गोवारी- मनसे, स्वप्नील महादेव कोळी- वंचित बहुजन आघाडी, सीताराम अर्जुन दिवे- अपक्ष हे प्रमुख उमेदवार भिवंडी ग्रामीण या अनुसूचित जमातीसाठी राखीव मतदारसंघात लढत देण्यासाठी सज्ज आहेत. सुरुवातीपासून या मतदारसंघात मागील निवडणुकीतील तीन उमेदवार भाजपात डेरेदाखल झाले होते. परंतु युतीचा निर्णय होत या जागेवर शिवसेनेचे शांताराम मोरे यांची उमेदवारी जाहीर झाली. तालुक्यात शिवसेना भाजपची ताकद तुल्यबळ असल्याने या मतदारसंघातील निवडणूक सोपी वाटत असतानाच राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष गणेश गुळवी, काँग्रेस तालुकाध्यक्ष राकेश पाटील यांनी निर्णायक भूमिका बजावीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माधुरी म्हात्रे यांना उमेदवारी मिळवून देण्यात यशस्वी झाले. माधुरी म्हात्रे यांनी शिवसेनेकडून पंचायत समितीचे सभापती पद भूषविले .
भिवंडी पश्चिममधून भाजपला देणार कॉग्रेस कडवी झुंज
भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघात आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी शिवसेनेचे नगरसेवक गलिच्छ वस्ती सुधार समितीचे सभापती अशोक भोसले यांनी अपेक्षे प्रमाणे आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे आता एकूण सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपले नशीब अजमाविण्यासाठी उभे ठाकले आहेत. त्यामध्ये भाजप-काँग्रेस या परंपरागत पक्षाचे उमेदवार महेश चौघुले विरुद्ध शोएब खान या विरोधकांमध्ये सरळ लढत होत आहे. मात्र, एमआयएम पुरस्कृत अपक्ष उमेदवार कोणाला तारक ठरतो हे येणारा काळ ठरवेल एवढे नक्की.
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षास सोडचिठ्ठी देत एमआयएमचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले खालिद गुड्डू शेख यांनी अपक्ष म्हणुनही उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, एमआयएमचा अर्ज काही तांत्रिक बाबींवरून बाद ठरविण्यात आल्याने ते एमआयएम पुरस्कृत अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात राहणार आहेत. त्यामुळे एकूण सात उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महेश प्रभाकर चौगुले-भाजप, मोहम्मद शोएब अशफाक खान - काँग्रेस, मोहम्मद खालीद मुख्तार अहमद शेख-एमआयएम पुरस्कृत अपक्ष, अबुसामा अबहुरेरा खान-बसपा, नागेश मुकादम - मनसे, सुहास धनंजय बॉंडे - वंचित बहुजन आघाडी, शाईम अफाक फारुकी - अपक्ष हे उमेदवार आहेत .
एमआयएम पुरस्कृत अपक्ष उमेदवार खालिद गुड्डू शेख यांना बॅट भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघात खरी लढत भाजपचे विद्यमान आमदार महेश चौघुले व काँग्रेस उमेदवार शोएब खान गुड्डू या 2014 चे प्रतिस्पर्धी असणाऱ्या दोन तुल्यबळ उमेदवारांमध्ये दुरंगी सामना रंगणार आहे.