नवी मुंबई - वाढती कोरोनाच्या रुग्णांची संख्या समस्त नवी मुंबईकरांच्या चिंतेत वाढ करत आहे.मात्र, कोरोनाबाधित महिलेने 6 एप्रिलला बाळाला जन्म दिला असल्याची सकारात्मक घटना घडली आहे. बाळं व माता दोघेही सुखरूप असून, माता व बाळाची सुखरूप सुटका केल्याने नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयाच्या डॉक्टरांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
नवी मुंबईत एका फिलीपाइन्स नागरिकांपासून कोरोनाबाधितांची संख्या 28 वर येऊन पोहचली आहे. त्यात एका घणसोलीमधील गरोदर महिलेला कोरोनाची लागणं झाल्याची माहिती मिळाली होती. या महिलेला नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात कार्यरत डाॅ. राजेश म्हात्रे व त्यांच्या टीमने देवदूत बनून या महिलेवर उपचार केले व महिलेचे सिझेरियन करण्यात आले. काही तास अंत्यत अटीतटीचे होते. मात्र, डॉ राजेश म्हात्रें व त्यांच्या टीमने प्रयत्नांची पराकाष्ठा करत या कोरोनाबाधित महिलेची सुखरूप प्रसुती केली. या कोरोनाबाधित महिलेनेे एका कन्येला जन्म दिला असून बाळं व माता दोघेही सुखरूप असल्याची माहिती नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मिळाली आहे.