ठाणे- जो व्यक्ती आपल्या घरासमोरचा रस्ता बनवू शकत नाही, तो विभागाचा विकास काय करणार, असा थेट सवाल करत आज मनसेचे ठाणे शहर उमेदवार अविनाश जाधव यांनी प्रचाराला सुरुवात केली. जाधव यांनी कोपरी पुलापासून आपल्या प्रचार यात्रेला सुरुवात केली. यावेळी जिंकून येताच कोपरी ब्रिजवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न आपण मार्गी लावणार, असे वचन जाधव यांनी ठाणेकरांना दिले.
सुशिक्षित आणि उच्चभ्रू समजला जाणारा ठाणे शहर मतदारसंघ हा गेल्या पाच वर्षांपासून भाजपच्या हातात आहे. स्वच्छ प्रतिमेचे मितभाषी संजय केळकर या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहे. परंतु त्यांच्या समोर मनसेचे खळ्ळ खट्याक अविनाश जाधव यांनी कडवे आव्हान उभे केले आहे.
दोन परस्परविरोधी व्यक्तिमत्व एकमेकांसमोर उभे असल्याने सामना खरोखरच रंजक होणार आहे. आज अविनाश जाधव यांनी कोपरी पुलापासून आपल्या प्रचार यात्रेला सुरुवात केली. कोपरी पूल हा ठाणे-मुंबईला जोडणारा अत्यंत महत्वाचा दुवा असून येथे प्रचंड वाहतूक कोंडी होते. दररोज तासनतास वाहनचालकांना या त्रासाला सामोरे जावे लागते. आपण जिंकून येताच पुलावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावू, असे वचन जाधव यांनी ठाणेकरांना दिले. महिलांनी औक्षवाण करून त्यांना शुभेच्छा दिल्या. मोठ्या उत्साहात त्यांच्या या रॅलीला सुरुवात झाली.
हेही वाचा- आरेमधील वृक्षतोडीचा निषेध; ठाण्यात युवकांचे आंदोलन
अविनाश जाधव यांची रॅली खऱ्या अर्थाने ऐतिहासिक होणार आहे. कारण ते आपल्या विधानसभा क्षेत्रातील संपूर्ण ३६ किलोमीटरचे अंतर पायी कापणार आहेत. खड्डे, पाणी, रोजगार असे अनेक ज्वलंत विषय घेऊन आपण ही निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. लोकांचा आपल्याला प्रचंड प्रतिसाद मिळत असून आपणच ही लढत जिंकणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या रॅलीत मोठ्या प्रमाणात मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
हेही वाचा- शिवसैनिकच करणार माझा प्रचार, मनसेचे अविनाश जाधव यांचा दावा