ठाणे - जगभर कोरोना विषाणूने थैमान घातले असून, याबाबत इंत्यंभूत माहिती आणि सरकारच्या सुचना पोहचण्यासाठी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजेच पत्रकार महत्त्वाचा असतो. मात्र, भिवंडीमध्ये कोरोना संदर्भातील बातमी संकलनासाठी गेलेल्या एका वृत्त वाहिनीच्या पत्रकाराला मारहाण करीत त्यांच्या हातातील कॅमेरा हिसकावून पळ काढल्याची घटना घडली आहे. ही घटना भिवंडी शहरातील खंडूपाडा परिसरात आज सायंकाळच्या सुमारास घडली.
हेह वाचा - मुंबई परिसरात कोरोनाचे एकूण १६ रुग्ण, एकाचा मृत्यू
मारहाण प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अनिल वर्मा असे मारहाण झालेल्या पत्रकाराचे नाव असून, ते 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीसाठी भिवंडी प्रतिनिधी म्हणून काम करतात. या दुर्दैवी घटनेचा सर्व पत्रकार संघटनांनी तीव्र निषेध केला आहे. सध्या कोरोनाने राज्यात शिरकाव केला आहे. यावर उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणी असलेल्या पानटपऱ्या चालकांना गर्दीची खबरदारी घेऊन त्यांना व्यवसाय करण्यास बंदी घातली आहे. याच संदर्भातील बातमी करण्यासाठी भिवंडीतील खंडूपाडा येथील पंजाबी हॉटेल येथे असलेल्या पाणीपट्टीच्या बाजूला गुटखा व पान खाऊन थुंकणाऱ्या इसमांची बातमी करण्यासाठी वर्मा याठिकाणी गेले होते.
गुटखा खाऊन थुंकणाऱ्यांचे कॅमेऱ्याने शूटिंग करत असताना येथील गुटखा व पान खाणाऱ्या तीन ते चार जणांनी वर्मा यांना अडवून त्यांना मारहाण केली व कॅमेरा घेऊन पळ काढला. याप्रकरणी पत्रकार वर्मा यांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, या घटनेचा शहरातील पत्रकारांनी विरोध करत आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे केली आहे. तर पत्रकारांना झालेल्या मारहाणीचा मी जाहीर निषेध करत असून मारहाण करणाऱ्या आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल अशी प्रतिक्रिया शांतीनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक ममता डिसुझा यांनी दिली आहे.