ठाणे - उल्हासनगरमधील काँग्रेसचे उपाध्यक्ष व व्यापारी महेश मिरानी यांच्यावर बॅनर लावण्याच्या वादातून ४ जणांच्या टोळीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात ४ जणांच्या टोळीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश मिरानी (५८) असे जखमीचे काँग्रेस उपाध्यक्षांचे नाव आहे.
पोलीससुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे उपाध्यक्ष व व्यापारी महेश मिरानी शहरातील कॅम्प नं. ४ येथील सेक्शन २७ परिसरात राहतात. त्यांचे मेन मार्केट रोडवर दुकान आहे. त्यांचा मुलगा दिपक दुकानात बसला असताना त्याने महेश यांना फोन करून गंगाधर भोसले हे शिवीगाळ करत असल्याचे सांगितले. महेश हे त्यांचा मोठा मुलगा पवन यांच्यासह स्कुटीवरून दुकानात आले असता ४ व्यक्ती हातात लाकडी बांबू घेऊन दुकानात घुसले. त्यांनी महेश व त्यांचा मुलगा दिपक व पवन यांना मारहाण केली. तसेच आरोपी गंगाधर याने हत्याराने महेश यांच्या गळ्यावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. इतर तिघांनी देखील त्यांना बेदम मारहाण केली.
मिरानी यांच्या दुकानाजवळील बॅनर लावण्याच्या कारणावरून उद्भवलेल्या वादातून ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. जखमी महेश मिरानी यांना उपचारासाठी सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात महेश मिरानी यांनी दिलेल्या तक्रारीवरून गंगाधर भोसले, दिपक सुंदरानी आणि इतर २ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. दिपक सुंदरानी याला अटक करण्यात आले आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरिक्षक रमेश भामे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक साळवे करत आहेत. महेश मिरानी यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी काँग्रेसमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. काँग्रेसचे उल्हासनगर शहराध्यक्ष राधारचरण करोतीया यांनी शिष्टमंडळासह पोलीस उपायुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदन देत महेश मिरानी यांच्यावर हल्ला करणाऱयांना त्वरीत अटक करण्याची मागणी केली आहे.