ठाणे - रमजान महिन्यात तणाव नको म्हणून मुंब्रावासियांना देण्यात आलेली सूट ईदनंतर पूर्णपणे बंद होणार आहे. मुंब्य्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाणे महापालिकेने उद्या २७ मेपासून शहरात कडकडीत लॉकडाऊन जाहीर केला आहे. औषधे आणि दूध वगळता सर्व दुकानांचे शटर डाऊन करण्यात येणार असून भाजी, मासळी, चिकन, मटण बाजार पूर्णपणे बंद राहणार आहे. इतकेच नव्हे तर लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यासाठी सकाळी केवळ ७ ते ९ या वेळेतच औषधे आणि दुधाची दुकाने खुली राहणार आहेत.
ठाणे महापालिका प्रशासनाने वागळे, लोकमान्यनगर, कोपरी, नौपाडा येथे कडकडीत लॉकडाऊन जाहीर केला आहे. मात्र, कोरानाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंब्य्रात पहिल्या दिवसापासूनच लॉकडाऊनचा फज्जा उडालेला दिसला. दाटीवाटीने थाटलेल्या दुकान, बाजारांमध्ये शेकडो नागरिक बिनधास्तपणे सोशल डिस्टन्सिंगला हरताळ फासत गर्दी करत आहेत. परिणामी मुंब्य्रात कोरोनाबाधितांचा आकडा ३००च्या घरात पोहोचला आहे.
रमजानच्या काळात कोरोनाग्रस्तांची संख्या लक्षणीय वाढल्याचे निदर्शनास आले आहे. मुस्लीमबहूल परिसर असल्याने धार्मिक तणाव नको म्हणून पालिकेने त्याकडे कानाडोळा केला. मात्र, आता वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उशीरा का होईना पालिका आयुक्त विजय सिंघल यांनी येथे २७ मेपासून बेमुदत काळासाठी कडकडीत लॉकडाऊन जारी केला आहे.
कडकीत लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी मुंब्य्रात कडक पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी शहरातील पोलिसांची जादा कुमक येथे वळवण्यात आली असून लॉकडाऊन तोडणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा पालिका उपायुक्त मनीष जोशी, सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी दिला आहे. अत्यावश्यक सेवा म्हणून सूट देण्यात आलेली किराणा, भाजीपाला दुकानेही लॉकडाऊनमध्ये पूर्णपणे बंद राहणार आहेत. या काळात गैरसोय होऊ नये यासाठी किराणा, भाजीपालासह मासळी, चिकन, मटण घरपोच देण्यास मुभा देण्यात आली आहे.