ठाणे : जेनेरिक आधारचे फक्त 21 वर्षाचे संस्थापक अर्जुन देशपांडे यांनी बालासोर, ओडिशा येथे झालेल्या विध्वंसक रेल्वे अपघातानंतर अविश्वसनीय कामासाठी आणि जलद प्रतिसादाबद्दल त्यांचे राष्ट्रपतींनी कौतुक केले. अर्जुन देशपांडे यांनी त्यांच्या 50+ जेनेरिक आधार फार्मासिस्टना हजारो पीडितांसाठी वैद्यकीय सहाय्य आणि मोफत अत्यावश्यक औषधांसोबत घटनास्थळी पाठवले. राष्ट्रपतींनी त्यांच्या या प्रभावी मदतीची दखल घेतली आणि त्यांच्या अतुलनीय कार्याचे कौतुक केले.
भारतीय तरुणांसाठी प्रेरणास्थान : यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अर्जुन देशपांडे यांचे 'नोकरी शोधणारा नव्हे तर नोकरी निर्माता बना' या संकल्पनेचे समर्थन केले. अर्जुन देशपांडे केवळ फार्मा क्षेत्रातच क्रांती करत नसून इतक्या लहान वयात भारतातील तरुणांसाठी प्रेरणास्थान बनले आहेत. राष्ट्रपतींकडून यावर शिक्कामोर्तबही करण्यात आले. या भेटीदरम्यान अर्जुन देशपांडे यांना राष्ट्रपतींकडून महाराष्ट्राचे लाडके दैवत विठ्ठल-रखुमाईची मूर्ती भेट म्हणून दिली गेली. राष्ट्रपतींकडून मिळालेल्या या आशीर्वादाने अर्जुन देशपांडे यांना भारताचे भविष्य घडवण्यात त्यांचे उदात्त योगदान चालू ठेवण्यास प्रेरणा मिळाली.
अर्जुन देशपांडे यांच्याविषयी : अर्जुन देशपांडे यांच्या व्यावसायिक आयुष्याची सुरूवात ते १६ वर्षांचे असतानाच एका प्रसंगामुळे झाली. एके दिवशी एक ज्येष्ठ व्यक्ती आपल्या कर्करोगग्रस्त पत्नीचे औषध घेण्यासाठी मेडिकल दुकानात आली होती. या व्यक्तीची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असल्याने आणि कर्करोगाची औषधे अत्यंत महाग असल्याने त्यांनी मेडिकल दुकानदाराकडे उधारीवर औषधे मागितली. हा प्रसंग पाहिल्यानंतर अर्जुन देशपांडे यांचे मन हळहळले व त्यातून यांच्या मनात ‘जेनेरिक आधार’ कल्पना घोळू लागली. पुढे त्यांनी अत्यंत परिश्रमातून ‘जेनेरिक आधार’चे बिझनेस मॉडेल उभे केले. ‘जेनेरिक आधार’च्या माध्यमातून मिळणारी औषधे काश्मीर ते कन्याकुमारी आणि कच्छ ते अरुणाचल प्रदेश अशी सर्वत्र मिळतात. १३० कोटी जनतेला स्वस्त व किफायतशीर दरात औषधे मिळवून देणे हे अर्जुन देशपांडे यांच्या ‘जेनेरिक आधार’चे प्रमुख उद्दिष्ट व मिशन आहे. अर्जुन देशपांडे यांच्या कार्याने इतर युवकांना निश्चित प्रेरणा मिळणार आहे.