ठाणे - खाकी वर्दीतल्या कविमनाच्या दर्दी अधिकाऱ्याची एक झलक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये या अधिकाऱ्याने अभिनेता नाना पाटेकर आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित यांची भूमिका असलेल्या वजूद या हिंदी चित्रपटातील नाना पाटेकर यांच्या खास शैलीत सादर केलेली 'कैसे बताऊ मै तुम्हे, तुम मेरे लिए क्या हो' ..ही हिंदी कविता सादर केली आहे. तसेच मराठीतही प्रेमाची भन्नाट कविता खाकी वर्दीलाही सादर करण्याचा मोह आवरता आला नाही.
या खाकी वर्दीतल्या दर्दी अधिकाऱ्याचे नाव आहे राजेश खोपकर. खोपकर सध्या कल्याण तालुका पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी ही कविता स्वतः सादर करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच गाजत असून, त्याची जोरदार चर्चाही नेटकऱ्यांमध्ये सुरू झाली आहे.
निवेदन, वाद्य कलाकार, कविमन असलेले स्मितहास्य देत सर्वांशी आपुलकीने बोलणारे आणि तितक्याच गांभीर्याने आपले कर्तव्य बजावणारे खोपकर हे सुरुवातीच्या काळात दूरदर्शनमध्ये कार्यरत होते. त्यानंतर मात्र ते पोलीस दलात भरती झाले. बिनधास्त आणि बेधडक वृत्तीचे पोलीस अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.
विशेष म्हणजे गेल्याच वर्षी गणेशोत्सवाच्या मिरवणुकीमध्ये बंदोबस्ताला असताना बॅन्जो पथकाबरोबर स्वतःही बॅन्जो वाजून त्यांच्यामधील कलाकार दाखवून दिला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमातही भीम गीत सादर करणे तसेच शिव जयंतीच्या कार्यक्रमात मंचावर व्याख्यान देणे हा वर्दीतला दर्दी माणूस आणि संवेदनशील कलाकार म्हणून उत्फूर्तपणे कला सादर करताना दिसत आहे. अशा पोलीस वर्दीतील कलावंतासाठी वर्दीच्या पलीकडे जाऊन एक संवेदनशील मन आहे, हे या व्हायरल व्हिडीओमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.